|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विशेष हें कृष्णचरित्र

विशेष हें कृष्णचरित्र 

गंगेच्या तीरावर परिक्षिती राजा नम्रपणे बसला आहे. त्याच्या समोर परमहंस, जितेंद्रिय, विषय जिणोनि जन्माला आलेले दादुले, महामुनी शुकदेव उच्च आसनावर विराजमान आहेत. दोघांनीही अन्नपाणी वर्ज्य केलेले आहे. शुकदेव तर विदेही आहेत. साऱया देहधर्मापासून ते मुक्त आहेत. परिक्षिती मात्र देहभान हरपून शुकमुखातून स्त्रवणारे श्रीमद्भागवत कथामृत प्राशन करत आहे. भगवान व्यासदेवांचा सुपुत्र, वय वर्षे अवघे सोळा, पुष्ट अवयव, विशाल डोळे, सुकुमार शरीर, अजानुबाहु, शंखाप्रमाणे मान, मस्तकावर कुरळे केस, भगवान विष्णूप्रमाणे श्यामवर्ण, निरंतर यौवन अवस्थेत असलेले, स्त्रियांचे मन हरण करणारे सौंदर्य ज्याच्या ठायी आहे पण जे स्वतः निष्काम आहेत, असे शुकमुनी राजा परिक्षितीला कृष्णकथा सांगत आहेत. राजा सर्वांगाचे कान करून ऐकत आहे. सभोवती ऋषी, मुनी, साधु, संन्यासी, भक्त, संत यांची मांदियाळी जमली आहे. शुकमुखातून भागवत श्रवण करण्याची अत्यंत दुर्लभ संधी ज्यांना प्राप्त झाली त्यांनी जन्मोजन्मी किती पुण्य केले असेल! वेदरुपी कल्पवृक्षाला लागलेले फळ म्हणजे श्रीमद्भागवत! ते वैकुंठलोकी होते. ते देवषी नारदांनी व्यासदेवांना आणून दिले. त्यांनी ते शुकमुखात ठेवले. शुक म्हणजे पोपट. पोपट खाण्यासाठी ज्या फळावर टोच मारतो ते फळ पिकलेले, रसाळ व मधुर असते. हे भागवतरुपी फळ शुकमुखातून गळलेले व अमृतरसाने भरलेले आहे. अशा या रसांचा आस्वाद परिक्षिती घेत आहे.

शापित परिक्षिती राजाचे उरलेले आयुष्य अवघे सात दिवसांचे होते. त्यातील पाच दिवस होऊन गेले. या पाच दिवसात शुकमुखातून भागवत ऐकता ऐकता काळ कसा सरला हे कळलेच नाही. आता भागवताचा दशमस्कंध कृष्णकथा सुरू झाली. आधीच भागवत कथा रसाळ त्यात कृष्णचरित्र सुरू झाल्यावर तर ती अधिकाधिक रसयुक्त झाली. तहान, भूक, देहधर्म सारं सारं परिक्षिती विसरला आहे. एकनाथ महाराज वर्णन करतात- शुकयोगींद्राप्रती। प्रश्न करी परीक्षिति।  भीमकीहरण श्रीपति।काय निमित्तीं पैं केलें।  राजाने शुकदेवांपाशी भगवंताने कोणत्या कारणाने रुक्मिणी हरण केले असा प्रश्न विचारला. विदेह अवस्थेत सदैव स्थित असलेल्या महामुनी शुकदेवांना देहधर्म कुठले? ते तर देहातीत होते. पण राजा सामान्य जीव होता. त्याला भूक लागणार, तहान लागणार! म्हणून अंमळ थांबून शुकदेव राजाला म्हणाले- का करितोसी म्हणसि प्रश्न । तरी मी त्यक्तोदक जाण । वदें कथामृत श्रवण । तें जीवन मज तुझेनि ।  राजा! आम्ही विदेही आहोत. आम्हाला देहधर्म नाहीत. त्यात तुला सांगत असलेली कृष्णकथा हेच माझे जीवन आहे. तू मात्र देही आहेस. मी थोडावेळ थांबतो. तुला तहान, भूक लागली नाही काय? तू क्षुधा, तृषा शमवून ये. देहधर्म उरकून ये. त्यावर परिक्षिती राजा म्हणाला- विशेष हें कृष्णचरित्र । तुझेनि शुद्धमुखें पवित्र । श्रवण करितां माझे श्रोत्र । अधिकाधिक भुकेले ।  इतर कथा नव्हे फुडी । नित्य नूतन इची गोडी । सेवू जाणति आवडी । ते परात्परथडी पावले।

Ad. देवदत्त परुळेकर