|Friday, August 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » फेसबुकवरचे मित्रमैत्रिणी

फेसबुकवरचे मित्रमैत्रिणी 

टीव्हीवर एक जुना विनोद गुंफलेली जाहिरात सतत दिसते. कामवालीने दांडी मारली आहे. गृहिणी तिला फोन करून खडसावते, “आधी कल्पना न देता दांडी मारलीस हे योग्य नाही.’’ कामवाली म्हणते, “मी काल फेसबुकवर पोस्ट टाकली होती आणि साहेबांनी लाईक केलं होतं. शिवाय साहेब म्हणाले होते की तुझी अनुपस्थिती आम्हाला तीव्रतेने जाणवेल. वुई वुईल मिस यू.’’ फेसबुकवर कोणाची कोणाशी मैत्री जमेल हे सांगता येत नाही. काही दिवसांनी असेही प्रसंग घडून आले तर आश्चर्य वाटणार नाही.

ङ ङ ङ

लग्नसमारंभ चालू आहे. वरातीत नवरदेव घोडय़ावर बसून रुबाबात इकडे तिकडे बघतो आहे. तेवढय़ात बँड पथकातली डोक्मयावर गॅसबत्ती घेतलेली वृद्ध स्त्री घोडय़ाच्या जवळ येते आणि नवरदेवाला म्हणते, “अभिनंदन हं. मस्त बायको मिळाली.’’ नवरदेव तिला ओळखत नाही.

“मावशी, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुमचं नाव काय?’’

“माझ्या नावाचं जाऊ देत. तू जागृती नावाच्या जिच्याशी रोज रात्री चॅटिंग करायचास ती मीच. प्रोफाईलवर मी एका तरुण मुलीचा फोटो लावल्यामुळे तुझा गैरसमज झाला!’’  

नवरदेवाचा चेहरा पडतो.

ङ ङ ङ

लग्न लागले आहे. साधे पाहुणे जेवून आणि अहेर देऊन मोकळे झाले आहेत. शेवटची पंगत बसली आहे. नूतन वधू-वर उखाण्यात गुंफून एकमेकांची पुनः पुन्हा नावे घेतात आणि एकमेकांना पुनः पुन्हा जिलबीचे घास भरवतात आणि त्याचे पुनः पुन्हा असंख्य फोटो काढले जातात. हे चालू असताना हातात जिलब्यांचे ताट घेतलेला मरतुकडा वाढपी सेवक ते ताट बाजूला ठेवतो आणि खिशातून चायनीज मोबाईल काढतो आणि वधूला विचारतो, “मॅडम, जेवण झालं का? झालं असेल तर एक सेल्फी घेऊ?’’

“मी तुला ओळखलं नाही.’’

“माझं नाव चंपक. मॅडम, तुमचे सगळे फोटो मी नियमित लाईक करतो. त्यावर बदाम टाकतो. तुम्हाला खूप जण रात्री मेसेज करून विचारतात की जेवण झालं का? मग दुसऱया दिवशी तुम्ही त्यांच्याबद्दल पोस्ट लिहिता. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला मेसेज करणाऱयांचा निषेध केला आहे.’’

“काढ सेल्फी.’’

सेल्फी काढल्यावर तो म्हणतो, “आज तुम्हाला मी विचारलं, जेवण झालं का? पण म्हणून उद्या माझ्यावर पोस्ट टाकू नका हं.’