|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उष्णलाटेमुळे 4 रेल्वेप्रवाशांचा मृत्यू

उष्णलाटेमुळे 4 रेल्वेप्रवाशांचा मृत्यू 

केरळ एक्स्प्रेसमधील तामिळनाडूच्या चार प्रवाशांनी गमावला जीव

झाशी 

 देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उष्णतेने सर्वसामान्यांचे जगणे अवघड करून टाकले आहे. तीव्र उष्णता आणि वाढलेल्या तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. विशेषकरून रेल्वेच्या जनरल आणि स्लीपर डब्यांमध्ये उष्णतेमुळे प्रवाशांची स्थिती अत्यंत खराब होत चालली आहे. उष्णतेमुळे सोमवारी आगरा आणि झाशीदरम्यान केरळ एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून प्रवास करणाऱया 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे प्रवासी आगरा येथून कोईम्बतूर येथे जात होते.

उत्तरप्रदेशासह उत्तर भारतात तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य बेहाल झाले आहेत. सोमवारी मथुरा येथे 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तरप्रदेशच्या बांदा येथे 49.20 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.

10 दिवसांपूर्वी 68 प्रवाशांचे एक पथक तामिळनाडू येथून वाराणसी तसेच आगरा येथे पर्यटनासाठी दाखल झाले होते. वाराणसी येथे भटकंती केल्यावर हे पथक शनिवारी आगरा येथे पोहोचले होते. तेथे फिरल्यावर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या पथकाने केरळ एक्स्प्रेसच्या एस-8 आणि ए-9 डब्यामधून प्रवास सुरू केला.

आगरा ते झाशीदरम्यान सिग्नल न मिळाल्याने भर उन्हात रेल्वे रोखून ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यातूनच 5 प्रवाशांची प्रकृती बिघडली, पण रेल्वे अर्ध्या वाटेत असल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. 4 प्रवाशांचा वेळीच उपचार होऊ न शकल्याने मृत्यू झाला आहे. संबंधित प्रवाशांचे मृतदेह झाशी रेल्वेस्थानकावर उतरविण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाचा युक्तिवाद

रेल्वे प्रशासन या घटनेबद्दल स्पष्ट भूमिका घेणे टाळत आहे. रेल्वेगाडय़ांना काही तांत्रिक कारणांमुळे विलंब होतो, पण प्रवाशांची प्रकृती अगोदरच बिघडलेली होती. अद्याप शवविच्छेदन अहवाल मिळालेला नाही, तो मिळाल्यावरच प्रवाशांच्या मृत्यूमागील नेमके कारण समजू शकेल असे उत्तर-मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंग यांनी सांगितले आहे.

मृतदेह कोईम्बतूरला पाठविणार

तामिळनाडूच्या निलगिरी येथील रहिवासी 80 वर्षीय पाची अप्पा पलानीसामी, 69 वर्षीय बालाकृष्णन रामास्वामी, कोईम्बतूरच्या 71 वर्षीय चिन्नारे आणि उट्टी कन्नूर येथील रहिवासी 87 वर्षीय सुबरय्या यांचा मृत्यू झाला आहे. तर एका प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.