|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » लंका-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द

लंका-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द 

वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल

श्रीलंकेला विश्वचषकातील सलग दुसऱया सामन्यात प्रतिस्पर्धी संघासमवेत गुण विभागून घ्यावे लागले आहेत. मंगळवारी येथे होणारा बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना एकेक गुण बहाल करण्यात आला.

दोन्ही संघांचा हा चौथा सामना असून या स्पर्धेत दोघांनी एकेक विजय मिळविला आहे. आज मिळालेल्या एका गुणानंतर लंकेचे आता 4 सामन्यांतून 4 गुण झाले आहेत तर बांगलादेशने 4 सामन्यांत 3 गुण मिळविले आहेत. दोन पराभवानंतर बांगलादेश संघ लंकेविरुद्ध विजय मिळविण्यासाठी उत्सुक झाला होता.  पण आता उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशेला थोडा धक्का बसला आहे. ‘मैदानात येणे आणि न खेळताच परतणे ही अत्यंत निराशाजनक आणि नाउमेद करणारी बाब आहे,’ असे बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मुर्तझा म्हणाला. ‘न्यूझींलंडविरुद्ध आम्हाला संधी मिळाली होती तर इंग्लंडविरुद्ध आमची कामगिरी नीरस झाली आणि आज मात्र सामना न झाल्यामुळे खूपच निराशा झाली,’ असेही तो म्हणाला.

पावसामुळे रद्द झालेला लंकेचा हा दुसरा सामना आहे. ‘या स्पर्धेतील गेले काही सामने पावसामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा खेळणे सोपे नसते. मात्र आमचीच वेळ खराब आहे, असे म्हणता येईल,’ असे लंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने म्हणाला. ‘मोठय़ा स्पर्धेत असे प्रकार घडतात, त्याची आम्ही सवय करून घ्यायला हवी. कठोर सराव चालू ठेवणे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज होणे, एवढे आम्हाला करावेच लागेल. आता पुढील प्रत्येक आम्हाला जिंकावाच लागेल, अशी स्थिती आहे,’ असेही तो म्हणाला.

या विश्वचषकात पावसामुळे रद्द झालेला हा तिसरा सामना असून स्पर्धेच्या इतिहासातील हा विक्रमच आहे. आगामी दोन दिवसात हा विक्रमही मोडला जाऊ शकतो, अशी सध्याची तरी स्थिती आहे. 1992 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात आणि 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत दोन सामने पावसामुळे वाया गेले होते. येथील स्पर्धेत साखळी फेरीतील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. बाद फेरीपासून मात्र तशी सोय करण्यात आली आहे. साखळी फेरीतही राखीव दिवस असायला हवा होता, असे बांगलादेशचे प्रशिक्षक स्टीव्ह ऱहोडस म्हणाले.

सकाळी नाणेफेकीसाठी दोन्ही संघ पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. मैदानाची पाहणी करण्याचा निर्णयही पंचांना दोनदा पुढे ढकलावा लागला. आच्छादनावर व मैदानात जमलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ग्राऊंड्समन शर्थीचे प्रयत्न करीत होते. पण पाऊस थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे पाहून स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.57 वाजता पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा रद्द झालेला हा पहिलाच सामना आहे तर लंकेला पाकविरुद्धच्या सामन्यातही एका गुणावर समाधान मानावे लागले होते. सोमवारी द.आफ्रिका व विंडीज यांचा सामनाही आठ षटकांचा खेळ झाल्यानंतर रद्द करावा लागला होता. लंकेचा पुढील सामना 15 जून रोजी लंडनमध्ये तर बांगलादेशचा सामना 17 जून रोजी विंडीजविरुद्ध टाँटनमध्ये होणार आहे.