|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » ही निवृत्ती फक्त खेळापुरती!

ही निवृत्ती फक्त खेळापुरती! 

2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा वनडे विश्वचषक. या दोन स्पर्धा आठवल्या तर नजरेसमोर झळकेल तो बुलंद बाण्याचा, पंजाब दा पुत्तर, युवराज सिंग!

युवराजने या दोन्ही स्पर्धा जवळपास एकहाती जिंकून दिल्या. निर्णायक क्षणी संघाला गरज असताना तर तो हमखास मदतीला धावून आला. 2003 नॅटवेस्ट चषक स्पर्धेतील फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध द्रविडच्या साथीने तर 2003 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याने धमाके केले.

केनियातील आयसीसी नॉकआऊट चषक स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर 19 वर्षांच्या कारकिर्दीत तो सातत्याने मैदान गाजवत राहिला. प्रतिस्पर्ध्यांवर सातत्याने तुटून पडत राहिला. युवराज 27 वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आणि चार वेळा तर 2011 विश्वचषकातच. या विश्वचषकात मालिकावीराचा मानकरी होता तो युवराजच.

युवराजने 13 शतके झळकावली त्यातील 10 शतके चौथ्या ते सातव्या स्थानी फलंदाजीला उतरलेले असताना केलेली आणि यातील बहुतांशी सामने भारतानेच जिंकलेले. त्यामुळे, युवराजने गोलंदाजांची धुलाई केली रे केली, भारताचा विजय हमखास ठरलेलाच.

लढणे हे जणू त्याच्या रक्तातच होते आणि म्हणूनच कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी तो एखाद्या कसलेल्या योद्धय़ाप्रमाणे लढला. त्यावर मात केली आणि जिद्दीने परिश्रम घेत, कठोर मेहनत करत त्याने पुनरागमन केले. अर्थात, पुनरागमन केल्यानंतर त्याच्यात पूर्वीचा जोश नव्हता आणि रवी शास्त्रींसारख्या धुरंधरांची त्याला साथ नव्हती. युवराजने आता पुनरागमन करु नये, आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक मॅच फिटनेस त्याच्याकडे नाही, असे त्यांना वाटायचे. पण, युवराज थांबला नाही. तो नेहमी मेहनतीवर, तंत्रावर भर देत राहिला आणि आजारी पडण्यापूर्वी त्यानेच तर 2011 मध्ये विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

2011 मधील विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत तो युवराजच होता, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 65 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली आणि ब्रॅड हॅडिन, मायकल क्लार्कसारखे फलंदाज बाद केले. तो सामनावीरही ठरला.

मधल्या फळीत (4 ते 7) भारतातर्फे सर्वाधिक धावा फटकावण्याच्या निकषावर युवराज धोनीपाठोपाठ दुसऱया स्थानी राहिला. यात धोनीचा वाटा 9245 धावांचा तर युवराजच्या खात्यावरील धावा 8193.

वनडे क्रिकेटमध्ये केविन पीटरसन हा युवराजचा नेहमी ‘बनी’ ठरला. त्याने केपीला चारवेळा बाद केले आणि कुमार संगकारा, फ्लिन्टॉफ, क्रेग मॅकमिलन, ग्रँट इलियॉट, मुश्फिकूर रहीम, मॉर्नी व्हान विक यांना प्रत्येकी तीनवेळा तंबूचा रस्ता दाखवला. युवराज-धोनी ही जोडी तर मैदानात हमखास जमायची. याचमुळे त्यांनी 19 अर्धशतकी भागीदाऱयांसह 2336 धावा जोडल्या. याशिवाय, युवीने द्रविड, तेंडुलकर, कैफ, विराट व रैना यांच्यासमवेतही प्रत्येकी 1 हजारपेक्षा अधिक धावांची भागीदारी केली.

युवी म्हणजे मैदानावरील सळसळते रक्त होते. तो स्ट्राईकवर आहे म्हटले तरी अगदी कसलेल्या गोलंदाजाला आपला रनअप सुरु होण्यापूर्वीच युवीने षटकारासाठी ऑफकडे भिरकावून दिल्याप्रमाणे वाटायचे. ही युवीची फलंदाजीवरील हुकूमत होती.

नावाप्रमाणेच युवराज तो. मैदानात त्याने फलंदाजी केली युवराजसारखी, लढला युवराजप्रमाणे आणि साम्राज्य गाजवले ते ही एखाद्या युवराजाप्रमाणे.

म्हणूनच भले युवराज खेळातून निवृत्त झाला असेल. पण, ही निवृत्ती फक्त खेळापुरती असेल.

युवराज आणि युवराजचे विश्वचषकातील योगदान आपल्या मनामनात कायम राहणारे आहे!