|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू 

प्रतिनिधी/ मिरज

चारित्र्याच्या संशयावरुन आणि माहेरहून आईकडून दोन लाख रुपये घेऊन यावे, या मागणीसाठी पती किशोर अर्जून वासुदेव (वय 36, रा. मंगळवार पेठ, दसरा चौक, मिरज) यांनी केलेल्या जबर मारहाणीत पत्नी सौ. वैशाली किशोर वासुदेव (वय 28) या ठार झाल्या. दोन जूनला राहते घरी ही मारहाण झाली होती. जखमी वैशालीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आज मंगळवारी तिचा मृत्यू झाला. शहर पोलिसांनी नवरा किशोर वासुदेव यास खुनाच्या गुह्यात अटक केली आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन किशोर वासुदेव हा वैशाली हिला सतत मारहाण करायचा. चोरीच्या गुह्या प्रकरणीही तिला मारहाण केली जायची. याशिवाय वैशालीने खर्च केलेले दोन लाख रुपये आईकडून घेऊन यावेत, म्हणूनही तिला सतत मारहाण व्हायची. दोन जूनच्या रात्रीही किशोर वासुदेव याने याच कारणावरुन वैशाली हिला तोंडावर आणि डोक्यात जबर मारहाण केली होती. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. घडल्या प्रकारानंतर सौ. वैशाली हिची आई श्रीमती सुनिता नागनाथ वाघमारे (वय 43, रा. गैबीपीरनगर, रामवाडी, सोलापूर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. आरोपीला तात्काळ अटकही करण्यात आली होती.

जखमी सौ. वैशालीवर उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी नवरा किशोर वासुदेव याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. याबाबत मुलीची आई श्रीमती सुनिता वाघमारे यांनी मुलीच्या मृत्यूस तिचा नवरा किशोर हाच जबाबदार असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दोन लाख रुपयांच्या मागणीसाठी तो तिला सतत मारहाण करायचा. पूर्वी झालेल्या चोरीच्या कारणावरुनही तिला त्रास दिला जात असल्याचे तिने सांगितले होते. याशिवाय तिच्यावर चारित्र्याचा संशयही घेतला जात होता, असे आई सुनिता वाघमारे हिने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.