|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीच्या उर्वीची ‘हमता पास’वर स्वारी

सांगलीच्या उर्वीची ‘हमता पास’वर स्वारी 

प्रतिनिधी/ सांगली

कडाडणाऱया वीजा आणि घोंगावणारा वारा तर कधी पाऊस तर कधी हिमवृष्टी अशा प्रतिकूल परिस्थितीत मूळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणाऱया उर्वी अनिल पाटील या 11 वर्षाच्या चिमुरडीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील 14 हजार 400 फुटावरील ‘हमता पास’ सर केला आहे. एवढय़ा लहान वयात हमता पास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली असून, मागील वर्षीच उर्वीने अवघड ट्रेक पूर्ण केला होता.

    उर्वीने मंगळवारी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली, आमच्या हमता ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कॅम्पवरून मागील आठवडय़ातील 3 जूनपासून झाली. पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटेछोटे ट्रेक केले. पुढे 5 जूनपासून प्रत्यक्ष ट्रेक ला सुरुवात झाली. रुमसू हा 6 हजार 100 फुटावरचा बेस कॅम्प असून पुढे चिक्का (8,100 फुट), जुआरु (9,800 फुट) आणि बालुका गेरा (12,000 फुट) असे कॅम्प करत 14,400 फुटावरील हमता पास सर केला. दिवसाला 7 ते 8 तासांचा डोंगरदऱया आाणि बर्फातील हा प्रवास सलग पाच दिवसात पूर्ण करताना शारीरिक व मानसीक क्षमतेचा कस लागणार होता, असा अनुभव उर्वीने व्यक्त केला.

हमता पास सर केला

     हमता पास हा कुलू आणि स्पिती व्हॅलीला जोडणारा जुना मार्ग आहे. मार्गावरून तिबिटीयन लोकांची ये-जा होते. या मार्गाला सिल्क मार्ग म्हणूनही ओळखले जाते. या ट्रेकिंगमध्ये बालुका गेरा ते रतनथळी व्हाया हमता पास हा ट्रेक सर्वाधीक अवघड होता. बालुका गेरा ते प्रत्यक्ष पासपर्यंत आठ तासांचा प्रवास पूर्णतः बर्फात असून सुमारे 2,400 फुट प्रत्यक्ष चढाईचे होते. शिवाय 10 हजार फुटानंतर ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला पाऊस आणि पासवर बर्फवृष्टी असल्याने ट्रेक पूर्ण करताना दमछाक होत होती. पण, अशा अवघड पास वर पोहचल्याचा आनंदच काही और होता.

मागील यशामुळे मिळाली संधी

साधारणपणे अशा प्रकारचे ट्रेक 16 वर्षांच्या युवक-युवतींसाठी असतात. मात्र, उर्वीने मागील वर्षी वयाच्या दहाव्या वर्षी अत्यंत अवघड सरपास सर केला होता. त्यामुळे यावर्षी कैलासरथ या ऍडव्हेंचर गृपने तिला आपल्या टिममध्ये सामावून घेतले.

पूर्वतयारी कामी आली

हिमालयातील हमता पास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक व शारीरिकरित्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रीत केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धातास योगा व खास जीम करायची. आहारामध्ये प्रामुख्याने सीफुड व सुकामेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरचे कपडे, गॉगल, ट्रेकींग बुट, स्टीकही खरेदी केली. त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वीने आत्मविश्वासाने सांगितले. या ट्रेकसाठी आईस गाईड सुभाष राणा आणि मुंबईच्या केतन पटेल यांनी मदत केल्याचे उर्वी म्हणाली.

आता एव्हरेस्ट बेस कॅम्पची तयारी

बिकट अवघड अशा सर पाससह हमता पास सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणवला आहे. आणि जगातील सर्वात अवघड एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने वाटचालीतील हे एक महत्वाचे पाऊल ठरेल. पुढील वर्षी पीन पार्वती आणि एव्हरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येय असल्याचे उर्वी सांगते.