|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मराठवाडय़ाला सरकारने 21 टीएमसी पाणी द्यावे

मराठवाडय़ाला सरकारने 21 टीएमसी पाणी द्यावे 

पंढरपूर, प्रतिनिधी

मराठवाडय़ाच्या दुष्काळी भागासाठी 21 टीएमसी पाणी देवून सरकारने वेगळे पॅकेज द्यावे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण नक्कीच व्हायला पाहिजे. त्यासाठी आमच्याकडून हवे तेवढे पाणी घ्या, कोल्हापुरकरांचे मन मोठे आहे. आमच्याकडे भरपूर पाऊस पडतो. राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापुरची हरीतक्रांती झाली आहे. त्यामुळे आम्ही कुणाचे पाणी आडवत नाही असे सांगत विठ्ठल मंदिरातील पुरातन वास्तुवर झालेल्या नवीन बांधकामाबाबत नाराजी व्यक्त करीत, जुन्या वास्तुचे जतन करा त्यांना गाडू नका असा सल्ला युवराज छत्रपती खा.संभाजीराजे यांनी दिला.

मंगळवारी दुपारी पंढरीत खा.संभाजीराजेंनी विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, लेखाधिकारी सुरेश कदम, बंटी वाघ आदी उपस्थित होते.

खा.संभाजीराजे म्हणाले, रायगडावर राज्यभिषेक सोहळ्याप्रसंगी विदेशातील विविध भागातील चार राजदूत उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात अनेकवेळा शिवाजीमहाराजांचे नाव घेतले, उपस्थितांनी टाळ्यावाजवून त्यांचे कौतुक केले. त्यामुळे शिवाजी महाराज परकियांना कळले आहेत परंतु स्वकियांना आजही कळलेले नाहीत. राज्यभिषक सोहळा राष्ट्रीय सोहळा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराज केवळ देशापुरता सिमीत नव्हते तर ते जागतिक किर्तीचे होते हे लोकांच्या मनात बिंबवायचे आहे.

यंदाच्या राज्यभिषेक सोहळ्यात मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बहुमान दिला असून, इतिहासात पहिल्यांदाच आम्ही घडविले आहे. आज शिवरायांची रयत अडचणीत आली आहे. शिवरायांचा नुसताच जयजयकार करु नका तर त्यांचे स्वराज्य समजावून घ्या. कुंभमेळ्यापेक्षा सरकारने जुनी मंदिरे व प्रथापरंपरांना भरघोस निधी द्यावा.

रायगड व परिसरासाठी 606 कोटी मंजूर असून, रायगड संवर्धन हा महत्वाचा विषय आहे. प्राधिकरणाला पैसे मिळत आहेत. परंतु नवीन अद्यादेशामुळे कामे करताना अडचण येत आहे. किल्ले स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी पर्यटन केंद्र करावे लागले. केंद्राच्या अख्यत्यारीत असलेल्या 10 किल्यांकरिता निधी मंजूर झाला असून राज्याच्या कानाकोपरा पंढरीला जोडला जावा, यासाठी नव्या रेल्वे गाडय़ा सुरु करण्यासाठी राज्यसभेत आवाज उठविणार आहे. पंतप्रधान मोंदीवर जनतेचे मोठा विश्वास टाकला आहे. त्यामुळे आता चांगले कामे व्हायला हवे असे सांगत छत्रपती खा.संभाजीराजेंनी विविध प्रश्नांना दिलखुलास पणे उत्तरे दिली.

Related posts: