|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोरेगावच्या नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

कोरेगावच्या नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल 

वार्ताहर/ एकंबे

कोरेगाव नगरपंचायतीच्या पुढील अडीच वर्षाच्या कार्यकालासाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या रेश्मा सुनील कोकरे यांनी दोन तर काँग्रेसतर्फे बाळासाहेब बाचल यांनी एक अर्ज दाखल केला. पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी छाननीमध्ये तिन्ही अर्ज वैध ठरविले आहेत. 

कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पहिला कार्यकाल दि. 14 रोजी संपत असून, पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा इतर मागासप्रवर्गासाठी आरक्षण आहे. नगरपंचायतीमध्ये आमदार शशिकांत शिंदे व किरण बर्गे यांची आघाडी असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 आणि काँग्रेसचे 3 सदस्य एकत्रित येऊन 11 जणांची आघाडी आहे. काँग्रेसच्या किशोर बाचल गटाच्या पाच सदस्यांसह विद्यमान नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे हे एकत्रित आले असून, त्यांचा 6 सदस्यांचा गट आहे.  

निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 ही वेळ होती. सकाळी 10.30 च्या सुमारास काँग्रेसतर्फे बाळासाहेब बाचल यांनी तर दुपारी 1.45 च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या रेश्मा सुनील कोकरे यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे अर्ज दाखल केला. पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी दाखल झालेल्या तिन्ही अर्जांची छाननी करुन, ते वैध ठरविले. छाननी प्रक्रियेत मुख्याधिकारी विनायक औधकर, निवडणूक विभागाचे अव्वल कारकून सारंग जाधव, नगरपंचायतीचे अधीक्षक खरात, बाळासाहेब सावंत, अजित बर्गे यांनी भाग घेतला.