|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गणेशवाडी-दत्तवाडी रस्त्याच्या कामाला मिळाला मुहूर्त

गणेशवाडी-दत्तवाडी रस्त्याच्या कामाला मिळाला मुहूर्त 

प्रतिनिधी/ कास

कास ठोसेघर परिसराला एकत्र जोडण्यासाठी दुवा ठरू पाहणाऱया गणेशवाडी, दत्तवाडी रस्ताच्या कामाला अखेर ग्रामपंचायतीच्या निधीतून शुभारंभ करण्यात आला आहे.

 परळी खोऱयात डोंगरमाथ्यावर वसलेल्या सांडवली, केळवली ग्रामपचांयती अंतर्गत दळणवळणापासुन वचिंत असणाऱया गणेशवाडी, दत्तवाडी या वस्त्यांना एकत्र जोडण्यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार रस्त्यासाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिल्या आहेत. अखेर ग्रामपचांयतीचे नवनिर्वाचित सरपंच गणेश चव्हाण यांनी ग्रामपंचायतीचा निधी उपलब्ध करून दोन्ही वस्त्यांना एकत्र जोडण्यासाठी रस्त्याच्या कटींग कामाला अखेर ग्रामस्थांच्या उपस्थीत शुभारंभ केला आहे.

 कास, जुंगटी, ठोसेघर, पळसावडे परिसराला एकत्र जोडून परिसरातील वाडय़ावस्त्यांना दळणवळणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कास ते जुंगटी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. हा मार्ग जुंगटी ते जळकेवाडी  दत्तवाडी गणेशवाडी ते वारसवाडी हा कच्या स्वरूपात मातीचा असून अंदाजे सात ते आठ किलोमिटरचा मार्ग पक्या (डांबरी) स्वरूपात बांधणे अपेक्षीत आहे. यासाठी ग्रामपंचातीचा निधी किंवा लोकसहभाग अपुरा पडत असून त्याला आमदार व खासदारांच्या प्रयत्नातून मोठया शासकीय निधीची गरज आहे. 

 तसेच कास ठोसेघर परिसराला डोंगर माथ्यावरून जुंगटी ते दत्तवाडी वारसवाडी मार्ग जोडल्यास स्थानिकांच्या दळवळणाचा कायमचा प्रश्न सुटणार असून पर्यटनालाही मोठा वाव मिळणार आहे. महाबळेश्वर, बामणोली, कास पठारवरून ठोसेघर, पाटण, कोयनानगर परिसराकडे जाणारे पर्यटक सातारा शहराकडे न वळता ते थेट कास, जुंगटी, पळसावडे ते ठोसेघर या मार्गावरून जावू शकतात. त्यामुळे पर्यटकांचा वेळ व पैशाची बचत होवून सातारा कास परीसरात होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे टळून डोंगरमाथ्यावरील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच रोजगार निर्मिती होवून परळी भागातील जनतेचा शहराकडे जाणारा लोंडा टळून या परिसराला पुन्हा एकदा नवसंजिवनी प्राप्त होईल.