|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लुबाडणूक करणारा भामटय़ा जेरबंद

लुबाडणूक करणारा भामटय़ा जेरबंद 

प्रतिनिधी/ सातारा

वाल्मिकी वधूवर सूचक केंद्राच्या संकेतस्थळावरुन साताऱयानजिक असलेल्या दिव्यनगरीमधील महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे अमिष दाखवत तसेच वेगवेगळे बहाणे करत महिलेकडून 9 लाख 95 हजार रुपये लुटणाऱया मुंबईतील मुलुंडच्या विनय राजेश लोहिरे या आरोपीस कौशल्याने तपास करत सातारा तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. या ठकसेनावर अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिव्यनगरी येथे राहणाऱया महिलेशी वाल्मिकी वधूवर सूचक केंद्राच्या संकेतस्थळावर झालेल्या संवादातून विनय लोहिरे याने ओळख वाढवली. नंतर त्या महिलेचा विश्वास संपादन करुन तिला लग्नाचे अमिष, आजाराचे कारण व अनेक बहाणे करत तिच्याकडून 9 लाख 95 हजार रुपये घेतले. याबाबत संबंधित महिलेने 24 मे रोजी विनय लोहिरे याने अशा
प्रकारे आपणास गंडा घालून फसवणूक केली असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

या तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण गिते, पोलीस नाईक सुजित भोसले, कॉन्स्टेबल रमेश चव्हाण यांच्या पथकाने हा तपास केला. आरोपीच्या शोधासाठी हे पथक मुंबईला रात्रंदिवस त्याचा शोध घेत होते मात्र तो चकवा देत होता. मात्र त्रोटक माहितीच्या आधारावर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत शेवटी ठकसेन विनय लोहिरे याला जेरबंद केले आहे. लोहिरेवर देवाची आळंदी, हडपसर येथे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्यानंतर तो ठकबाज असून मुंबईत महागडय़ा घरात राहून ऐषोआरामी आयुष्य जगत होता. त्यामुळे परिसरातील लोकांनाही त्याच्याबद्दल काही संशय येत नव्हता.

या कारवाईबद्दल तपास पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले आहे. अशाप्रकारे कोणी संशयित नजरेस आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे.