|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाची एसपींकडून पाहणी

मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाची एसपींकडून पाहणी 

प्रतिनिधी/ कराड

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण गुरुवार 13 रोजी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यानिमित्ताने शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले असून, या सभास्थळाची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली.

प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱया या कार्यक्रमाची जय्यत तयारी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शेतकरी मेळाव्यासाठी कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सभास्थळालगत उभारण्यात येणाऱया हेलिपॅडची पाहणी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱयांना सूचना दिल्या.

यावेळी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, बाळाशीराम शिंदे, गणेशप्रसाद भरते, कृष्णा कारखान्याचे संचालक गिरीश पाटील, सुजीत मोरे, सेक्रेटरी मुकेश पवार, प्राचार्य डॉ. भास्कर जाधव, डी. व्ही. कुंभार, कामगार कल्याण अधिकारी अरूण पाटील, सुरक्षा अधिकारी संपतराव पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, पिनू जाधव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.