|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्याला ‘वायू’ चक्रीवादळचा धोका टळला

गोव्याला ‘वायू’ चक्रीवादळचा धोका टळला 

गुजरातच्या दिशेने वादळाची आगेकूच समुद्री तुफानामुळे नद्यांतील पाणीपातळीत वाढ

विशेष प्रतिनिधी / पणजी

अरबी सुमद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाचा आता गोव्याला कोणताही धोका राहिलेला नाही. मंगळवारी दुपारी वादळाने आपली दिशा बदलून ते गुजरातच्या दिशेने आगेकूच करीत आहे. मात्र समुद्री तुफानामुळे राज्यातील समुद्राला जोडलेल्या नद्यांतील पाण्याचा स्तर वाढला असल्याने अनेक किनाऱयांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळपासून गोव्यात पावसाला प्रारंभ झाला आहे. उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील पाच दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे.

राज्यात मंगळवारी पावसाने जोर धरला. विशेषत: सायंकाळी उशिरा किनारी भागात जोरदार वाऱयासह पाऊस झाला. गोव्यापासून 350 कि. मी. आत अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाने आणखी जोर पकडला आहे. परंतु ते पुर्वेकडे न सरकता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकू लागल्याने गोव्यावरील वादळाचा धोका टळला. हे वादळ आता गुजरातच्या दिशेने ताशी 15 कि. मी. पेक्षाही जास्त वेगाने सरकू लागले आहे. उद्या 13 जून रोजी पहाटे ते गुजरातच्या पोरबंदर ते माहुआ दरम्यानच्या वसवेळ किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज आहे. तेथून ते दीव पर्यंत पोहचेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात

अरबी समुद्रातील वादळासोबत गोव्यात मंगळवारी पावसाला प्रारंभ झाला. मात्र मान्सून अद्याप गोव्यात पोहोचलेला नाही. सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. अरबी समुद्रातील वादळाचा परिणाम म्हणून वेंगुर्लापासून पुढे पर्यंत महाराष्ट्राच्या किनारी भागावर त्याचा प्रभाव पडणार असून समुद्राच्या लाटा 4 ते 5 मीटर उंचीपर्यंत जातील. तसेच किनारी भागात समुद्रातील पाण्याचा स्तर बराच उंचावण्याची भीती व्यक्त केली आहे.

 राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस

पणजी वेधशाळेने आगामी 48 तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून पुढील 5 दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात सर्वत्र पाऊस

मंगळवारी राज्यात सर्वत्र पाऊस झाला. सर्वाधिक 17.2 मि. मी. पाऊस सांगे मध्ये तर सर्वात कमी 1.6 मि. मी. पाऊस सांखळीत झाला. म्हापसा 5.2, पेडणे 4.4, फोंडा 5.2, पणजी 6.4, वाळपई 4.1, काणकोण 10.2, दाबोळी 11.2, मडगाव 4.4, मुरगाव 9.6, केपे 7.4 तुरळक पाऊस सर्वत्र पडला.

पणजीत सायंकाळी उशिरा मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक रस्त्यावर गटराचे पाणी आले. 18 जून रस्ता पाण्याखाली गेला. काही वेळ वाहनेही पाण्यात अडकली.