|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नियोजनाअभावी पावसाचे पाणी घरात

नियोजनाअभावी पावसाचे पाणी घरात 

वार्ताहर/   हुक्केरी

गेल्या दहा वर्षात हुक्केरी शहराचा विस्तार गतीने होताना दिसत आहे. मात्र नव्या वसाहती निर्माण करताना तसेच रस्ते व गटार निर्मिती करताना योग्य ती रचना न झाल्याने पावसाळय़ात रस्त्यावर पाणी साचणे. तसेच गटारीऐवजी पाणी घरात घुसण्याची नामुष्की यावेळी देखील ओढवली आहे. याला पालिका प्रशासनाचे विस्कळीत नियोजन कारणीभूत ठरल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

पाणी घरात तसेच दुकानात शिरणे हा प्रकार तिसऱयांदा होत असून याला जबाबदार कोण? असा सवाल करण्यात येत आहे. तीन वर्षामागे जुन्या बसस्थानकातील श्रीनिवास मेडिकल, कर्नाटक क्लॉथ सेंटर, राजू टीव्ही सेंटर तसेच सर्वेश जकाती यांच्या घरात पाणी शिरुन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधींसह प्रांताधिकारी तसेच सर्व अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती व योग्य नियोजन करून या समस्येला आळा घालण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नुकसान भरपाईचीही ग्वाही दिली होती. मात्र त्यापैकी काहीच झाले नाही.

रविवारी रात्री शहरात पहिला पाऊस पडला आणि गटारी तुंबून पाणी रस्त्यावरुन घरात, दुकानात, गल्लीत शिरुन लाखो रुपये नुकसान झाले. यामुळे संतापलेल्या महिला व नागरिकांनी रविवारी रात्रीच नगरपरिषदेकडे धाव घेतली. मात्र तेंव्हा कोणीच नसल्याने सोमवारी दुपारी पुन्हा महिला व पुरुषांनी जाऊन नगरपरिषदेला घेराव घातला व कार्यालयातील काचा व कागदपत्रांची नासधूस केली. यावेळी परिस्थिती बिघडत चालल्याचे पाहून पोलिसांनी मध्यस्थी करुन घेराव आटोक्यात आणला व सदर नागरिकांवर सरकारी कार्यालयाची नासधूस केल्याचा गुन्हा दाखल केला.

दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप

शहरातील गटारीत साचलेला कचरा काढून स्वच्छता करावी, अशा मागणीचे निवेदन वेळोवेळी नगरपरिषदेला देण्यात आले. मात्र त्याकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले. तसेच गेल्या दोन वर्षांपासून घरात तसेच रस्त्यावर साचणारी पाणी समस्या निवारण्याचे आश्वासन देऊनही दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा पारा चढला.

खासदार लक्ष देतील काय?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे आण्णासाहेब जोल्ले यांना हुक्केरी विधानसभा क्षेत्रात 31 हजार मताधिक्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शहराला भेडसावणाऱया या समस्येकडे खासदार लक्ष देतील का? हे पहावे लागेल. याशिवाय आमदार उमेश कत्ती, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही याकडे लक्ष देऊन गंभीर समस्या सोडविण्यात हातभार लावावा, अशी मागणी होत आहे.

कन्नड शाळेत पाणीच पाणी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही किल्ला भागातील सरकारी कन्नड माध्यम शाळेत पाणी शिरले असून विद्यार्थ्यांना यामुळे समस्येला सामोरे जावे लागत आहे. यावरुन शाळा सुधारणा समितीचे उदय हुक्केरी, मुख्याध्यापक महांतेश संबळ व शिक्षकवृंदानी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे. मान्सूनपूर्व पावसात अशी स्थिती तर तोंडावर असणाऱया पावसाळय़ात काय होणार? या विचारानेच एसडीएमसी व शिक्षकांसमोरील चिंता वाढल्याचे दिसत आहे.

एकूणच शहराचा विस्तार होत असताना खासगी तसेच सार्वजनिक विकासकामे योग्य पद्धतीने होत आहेत की नाहीत? याकडे नगरपरिषदेने वेळोवेळी लक्ष द्यावे. तसेच नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्या निकालात काढावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बॉक्स

कायदा हातात घेऊ नये

नगरपरिषदेत कामगार कमी असल्यामुळे गटारीची स्वच्छता करण्यास विलंब होत आहे. नागरिकांनीही गटारीत कचरा तसेच प्लास्टिक टाकू नये. गटारींच्या स्वच्छतेबद्दल नागरिकांनी दिलेले निवेदन योग्य असले तरी नगरपरिषदेत नासधूस करून कायदा हातात घेणे चुकीचे आहे. त्यामुळेच फिर्याद दाखल करण्यात आल्याचे मुख्याधिकारी कृष्णा नाईक व गौरीशंकर महाळंत यांनी सांगितले.