|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दाभोळमधील बोटींची आयबी, एटीएसकडून चौकशी

दाभोळमधील बोटींची आयबी, एटीएसकडून चौकशी 

वार्ताहर/ दाभोळ

  दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरात गेल्या चार दिवसांपासून असलेल्या ‘फू युआन यू 059’ आणि  ‘फू युआन यू 061’ या ओशियन स्टार कंपनीच्या दोन मासेमारी नौकांच्या चौकशीसाठी आयबी आणि एटीएसचे पथक मंगळवारी येथे दाखल झाले. त्यांच्यासह संबंधित विविध खात्यांच्या अधिकाऱयांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, भाषेच्या अडचणीमुळे दुभाषकही बोटीवर दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत बोटीवरील कॅप्टनसह कर्मचाऱयांचे जबाब घेण्याचे काम सुरू होते.

   गेल्या सहा दिवसांपासून भारती शिपयार्डच्या आसऱयाला असलेल्या या बोटीवर असणारे सर्व खलाशी हे चिनी आणि फिलीपिन्स असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुभाषकांना बोलावण्यात आले. मंगळवारी दाखल झालेल्या या दुभाषकांच्या माध्यमातून बोटीवरील कॅप्टन, स्टाफ यांच्याकडून सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर दोन्ही बोटींना भारती शिपयार्ड परिसरात पाठवण्यात आले. प्राथमिक तपासामध्ये या बोटींवर संशयास्पद वस्तू न आढळल्याने सदर बोटींना सुरक्षितता, डागडुजीसाठी भारती शिपयार्ड कंपनीमथ्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र चिनी बोटी केवळ मासेमारी करत इथवर का आल्या? त्यांची इंधन क्षमता किती? पकडलेले मासे ते कोठे विकणार होते? आर्थिकदृष्टय़ा हे त्यांना कसे परवडते? आदी प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. शिवाय सुरक्षिततेसाठी लागणाऱया आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम त्यांनी रत्नागिरीतील ‘युनिक मरीन एजन्सी’ या शिपिंग एजन्सीला दिले होते, अशी माहिती तपास यंत्रणानी दिली असली तरी यातील सत्यता मात्र लवकरच समोर येणार आहे.

  दरम्यान, मंगळवारी आयबी (इंटेलीजन्स ब्युरो), एटीएस (ऍन्टी टेररिस्ट स्क्वॉड), तसेच नेव्हीचे अधिकारीही दाभोळमध्ये दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यत बोटीवरील सर्वाची चौकशी सुरू होती. त्याचबरोबर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह कोस्टगार्ड कमांडंट, प्रादेशिक बंदर अधिकारीही येणार असल्याचे कळले, मात्र सायंकाळी ऊशिरापर्यंत याबाबत संबंधित अधिकाऱयांची भेट होऊ शकली नाही.