|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » झारखंडमध्ये फादर स्टेन स्वामींच्या घरावर छापा

झारखंडमध्ये फादर स्टेन स्वामींच्या घरावर छापा 

ऑनलाईन टीम  / पुणे :

एल्गार हिंसाचार प्रकरणात नक्षलवादी हितसंबंध असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी रांची येथील फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर बुधवारी छापा टाकला. स्वामी यांच्या घरातून हार्डडिस्क, लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि काही महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी कबीर कला मंचच्या वतीने कोरेगाव-भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियान या नावाने शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही आक्षेपार्ह भडकाऊ गाणी सादर करण्यात आली. तसेच समाजात तेढ निर्माण करणारे भडकाऊ व चिथवाणीखोर वक्तव्य करुन पत्रके व पुस्तिका वाटण्यात आल्या. त्याची परिणीती म्हणून कोरेगाव-भीमा व जवळील परिसरात दुसऱया दिवशी दगडफेक, हिंसाचार, जाळपोळ झाल्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात तुषार दामगुडे यांनी दिली होती. त्यानुसार आत्तापर्यंत एकूण 22 जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये वरवरा राव (तेलंगणा), अरुण फरेरा (मुंबई), सुधा भारद्वाज (हरियाणा), गौतम नवलखा (दिल्ली), सुधीर ढवळे (मुंबई), रोना विल्सन (दिल्ली), शोमा सेन (नागपूर), महेश राऊत (चंद्रपुर) या आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली असून, सध्या त्यांना पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. एल्गार परिषदेच्या अनुषंगाने नक्षलवादी चळवळीबाबत जो तपास करण्यात येत आहे, त्याअनुषंगानेच बुधवारी स्वामी यांच्या घरावर छापे टाकण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.