|Friday, August 23, 2019
You are here: Home » leadingnews » मोदींचे विमान पाक हद्दीतून जाणार नाही

मोदींचे विमान पाक हद्दीतून जाणार नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱया शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशनच्या शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाहीत. मोदींचे विमान ओमान, इराण आणि मध्य आशियाई देशाच्या हवाई क्षेत्रातून किर्गिस्तानच्या बिश्केक येथे जाईल, अशी माहिती परराष्ट्र विभागाच्या सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या 13 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकल रवाना होणार आहेत. बिश्केकला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला दोन पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायावर परराष्ट्र मंत्रालयाचा विचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करत बिश्केकला जाणार असल्याची माहिती पुढे आली होती. त्यासाठी पाकिस्ताननेही नरेंद्र मोदी यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून मोदी प्रवास करणार नसल्याचा निर्णय झालेला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्ताच्या बालकोट भागावर एअर स्ट्राईक केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राच्या हद्दीतील उड्डाण बंद केली होती. जवळपास 3 महिने झाले तरी पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रातील 2 मार्ग खुले केले आहेत. हे दोन्हीही मार्ग दक्षिण पाकिस्तानहून जातात.