|Sunday, August 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘स्वच्छ गोवा’चे ध्येय पूर्ण होईल का?

‘स्वच्छ गोवा’चे ध्येय पूर्ण होईल का? 

गोव्यात राज्यपाल मृदुला सिन्हा यांना स्वच्छतेचे ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेच्यादृष्टीने पावले उचलली आहेत, मात्र स्वच्छ गोवा हे स्वप्न केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात ते साकार होईल का, हा एक संशोधनाचा विषय म्हणावा लागेल.

 

स्वच्छ भारत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली गोव्यासह देशातील सर्व राज्यांनी स्वच्छतेचा नारा दिला आहे. गोवा राज्यातही राज्यपाल मृदुला सिन्हा यांना स्वच्छतेच्या ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातही सर्व ठिकाणी स्वच्छतेच्यादृष्टीने पावले उचलली आहेत, मात्र स्वच्छ गोवा हे स्वप्न केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात ते साकार होईल का, हा एक संशोधनाचा विषय म्हणावा लागेल. गोव्यातील बहुतेक विद्यालयांमध्ये तसेच पंचायत, नगरपालिकांमधून स्वच्छतेचा नारा दिला जात आहे. त्याचे फोटो प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. मात्र हे स्वच्छतेचे उद्दिष्ट केवळ देखावा तर ठरणार नाही ना, असाही समज सध्या सर्वसामान्य गोमंतकीयांमध्ये निर्माण झाला आहे.

 बसेसमधून प्रवास करणारे काही प्रवासी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळतात व बाहेर थुंकतात, असे प्रकार सर्रास घडत असतात. बसच्या मागून प्रवास करणाऱया काही दुचाकी चालकांच्या अंगावर ही पिचकारी पडण्याचेही प्रकार घडतात. यातून अनेकवेळा भांडणे झाली आहेत. बसमध्ये ‘थुंकू नये’ असे ठळकपणे लिहिलेले असतानाही असे प्रकार घडत असतात. यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

गोव्यातील बहुतेक बसस्थानके दुर्गंधीचे माहेरघर बनली आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. बसस्थानकावर सुलभ शौचालये उभारली असतानाही उघडय़ावरच लघुशंका करणारे कित्येक प्रवासी आढळतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. पर्यटनाच्या नावाखाली गोव्यात येणाऱया पर्यटकांकडून उघडय़ावर दारू पिऊन धिंगाणा घालणे तसेच दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त फेकल्या जातात तसेच अन्य कचरा टाकला जातो. यावरही कडक निर्बंध आवश्यक आहेत. प्लास्टिक आज स्वच्छतेच्या मार्गात प्रमुख अडसर आहे. पर्यावरणाला हे घातक ठरते. गोव्यात येणारा बहुतेक विदेशी नागरिक आज ‘नो प्लास्टिक’ म्हणून दुकानदारांना प्लास्टिक पिशवीतून वस्तू न देण्याचा आग्रह धरतो मात्र गोमंतकीय आज सर्रास प्लास्टिक वापरत आहे. प्लास्टिक वापरण्याची सवय  अंगवळणीच पडली आहे. गोव्यात काही ठिकाणी पंचायतींनी तसेच नगरपालिकांनी प्लास्टिक बंदी कडकपणे राबविण्याचे ठरविले आहे. स्वच्छतेच्यादृष्टीने हे निश्चितच स्वागतार्ह असले तरी प्लास्टिक विल्हेवाटीसाठी योग्य तो प्रकल्प आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

स्वच्छ भारत या शीर्षकाखाली ठिकठिकाणी स्वच्छतेचा नारा जपला जात असला तरी गोमंतकीयांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. स्वच्छ पेयजल उपलब्ध करण्यासाठीही संबंधित यंत्रणेने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. पावसाच्या पहिल्याच सरीने शहरातील अनेक भागात गटारातील घाण रस्त्यावर आली आहे. यातून स्वच्छतेची लक्तरे जणू बाहेर पडलेली आहेत. यावर कारवाई आवश्यक आहे.

मोकळय़ा जागेत कचरा टाकल्यास ठरावीक दंड भरावा लागेल, असे फतवे काही शहरात काढण्यात आले असले, यासंबंधी फलक लावले असले तरी याकडे दुर्लक्ष करून लोक मोकळय़ा जागेत बिनधास्तपणे कचरा आणून टाकतात, असेही एका पाहणीत आढळून आले आहे. दंडाची भीती नसल्याचेही दिसून येते. मडगाव पालिकेने तर ‘कचरा सेन्टिनल’ हा उपक्रम राबविला आहे. शहराच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणात रस्त्यालगत वा मोकळय़ा जागी कचरा आणून फेकण्याचे जे प्रकार होऊ लागले आहेत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे पालिकेने ठरविले आहे. कचरा फेकणाऱयांच्या वाहनांच्या क्रमांकानुसार छायाचित्रे टिपून ती नगरपालिकेकडे पाठविणाऱयांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. त्याचप्रमाणे त्यांची ओळखही गुप्त ठेवली जाईल, असे पालिकेने जाहीर केले आहे. अशाप्रकारचा उपक्रम अन्य भागांमध्येही झाल्यास उघडय़ावर कचरा फेकणाऱयांवर अंकुश येईल.

नुकत्याच साजरा झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अनेक संस्थांनी त्यादिवशी आपला परिसर स्वच्छ करण्याच्यादृष्टीने उपक्रम राबविले, हे निश्चितच कौतुकास्पद असले तरी हे उपक्रम वारंवार राबविण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. गोव्यात उघडय़ावर दारू सेवन करण्याचे प्रकार होतात. ओल्या पाटर्य़ा काही ठिकाणी नित्याच्याच झालेल्या आहेत. बहुतांश डोंगर परिसरात, पुलाच्या परिसरात, नदीपात्रानजीक बऱयाच प्रमाणात दारूच्या बाटल्या, बियर बाटल्या व कॅन, प्लास्टिक व काचेच्या बाटल्यांचा खच सर्रास पडलेला असतो. यावर कडक कारवाईची आवश्यकता आहे. गोव्यातील काही भागात नाल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा झालेला आढळून येतो. या प्लास्टिक कचऱयामुळे पावसाळय़ात नाले तुंबून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. यावरही योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. 

एकीकडे कचरा उचलचा नारा लावण्यात येत आहे तर दुसरीकडे कचरा विल्हेवाट प्रकल्प जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक बनले आहेत. हल्लीच मडगाव येथील सोनसडा कचऱयाच्या ढिगाऱयाला लागलेल्या आगीचा विषय गोव्यात बराच गाजलेला आहे. या आगीतून निर्माण झालेल्या धूर व राखेमुळे या परिसरातील लोकवस्तीतील नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला. अन्य भागात असलेले कचरा विल्हेवाट प्रकल्पही सोनसडाप्रमाणे उग्र रूप धारण करून ग्रामस्थांना सतावणार तर नाहीत ना, असा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे. संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा कचरा मोहिमेचे तीनतेरा वाजू शकतात.

गेल्या महिन्यात झालेल्या गेवा घटक राज्य दिन कार्यक्रमानिमित्त राज्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘हरित गोवा, स्वच्छ गोवा’ या अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यासाठी वर्षभर राज्यात विविध स्वच्छतेचे उपक्रम राबविले जाणार आहेत. या अभियानांतर्गत पंचायत व नगरपालिकांसाठी स्वच्छतेच्या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. जी पंचायत व नगरपालिका आपला परिसर साफ, स्वच्छ, कचरामुक्त करणार त्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषित केले आहे. या अभियानामुळे स्वच्छ गोवाचे स्वप्न येत्या काळात पूर्ण होईल का, हे पहावे लागेल. अन्यथा हे अभियान ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’ अशातला प्रकार होऊ नये म्हणजे झाले. गोवा राज्य ‘हागणदारी मुक्त’ करण्याचा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ही मोहीम कितपत यशस्वी होते, हेही पहावे लागेल.

राजेश परब