|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कनकासवें जैसी कांती

कनकासवें जैसी कांती 

परिक्षिती राजा हा सामान्य श्रोता नव्हे. याज्ञवल्क्मय ऋषींना उत्तम श्रोता लाभला राजा जनक. भगवान श्रीकृष्णांना उत्तम श्रोता लाभला अर्जुन. त्याचप्रमाणे महामुनी शुकदेवांना उत्तम श्रोता लाभला राजा परिक्षिती. याला श्रवण भक्तीचा आदर्श मानायला हवा, तो कशासाठी? प्रत्यक्ष मृत्यू डोक्मयावर घिरटय़ा घालत असताना परिक्षिती राजा शुकदेवांना म्हणाला-मुनिवर्य! ही तहान भूक मला पूर्वी फार पिडत होती. पण ज्या क्षणापासून आपल्या मुखातून श्रीकृष्णकथामृत प्राशन करीत आहे, त्या क्षणापासून माझी तहान भूक हरपली आहे. मुनिवर्य, आपले वदनकथामृत हेच माझे जीवन आहे. हे कृष्णचरित्र आपल्या मुखातून ऐकत असता माझ्या कानांना अधिकाधिक भूक लागते आहे. ही कथा इतर कथांप्रमाणे सामान्य नाही. हिची गोडी नित्यनूतन आहे. जे हिचे आवडीने सेवन करू जाणतात ते संसार नदीच्या पैल तीरावर सहजच पोहोचतात. परिक्षितीने, भगवंताने रुक्मिणी हरण का केले हे जाणून घेण्याची जिज्ञासा शुकदेवांपाशी प्रकट केली होती. त्यावर शुकदेव काय म्हणाले हे एकनाथ महाराज सांगतात- देखोनि प्रश्नाचा आदर ।  शुक कथेसी झाला सादर । कैसा वचन बोलिला गंभीर।  कृपा अपार रायाची । ऐक बापा परीक्षिती ।  तूं तंव सुखाची सुखमुर्ती । भीमकीपाणिग्रहणस्थिती । यथानिगुती सांगेन । परिक्षितीबद्दल साधुशिरोमणी शुकदेवांच्या मनात अपार करुणा आहे. परिक्षितीच्या मनाचा शुद्ध भाव व जिज्ञासा जाणून शुकदेव रुक्मिणी स्वयंवर कथा सांगण्यास सिद्ध झाले. शुकदेव राजाला म्हणाले-ऐक बापा परिक्षिती! तू तर सुखाची सुखमूर्ती आहेस कारण सर्व सुखांचे आगर असणारी श्रीकृष्णकथा सांगण्यास तू मला पुन्हा पुनः उद्युक्त करतो आहेस. आता तुला मी नित्यनूतन अशी रुक्मिणी स्वयंवर कथा यथासांग सांगेन.  अगा वसुदेवाचिये तप:प्राप्ती । श्रीकृष्ण देवकीउदरा येती। कृष्णाची जे कृष्णशक्ती। जाली उतरती भूमंडळीं। कनकासवें जैसी कांती । सूर्यासवे जैसी दीप्ती । तैसी अवतरली कृष्णशक्ती । विदर्भदेशी रुक्मिणी। गतजन्मात वसुदेव सुतपा होते व देवकी पृश्नी होती. वसुदेव देवकीने या पूर्वजन्मात कठोर व उग्र तपश्चर्या केली. त्यांनी झाडांची शुष्क पाने खावून तप केले. देव प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले-वर मागा. त्यावर पृश्नी म्हणाली-देवा! तुझ्यासारखा पुत्र आम्हास व्हावा. त्यावर देव म्हणाले-माझ्यासारखा मीच आहे, दुसरा कोणी नाही. मीच पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्माला येतो. त्या जन्मातील सुतपा व पृश्नी पुढील जन्मी वसुदेव देवकी झाले व भगवान त्यांच्या तपश्चर्येमुळे कंसाच्या कारागृहात त्यांच्या पोटी जन्मास आली. सुवर्णाबरोबर जशी त्याची कांती येतेच, सूर्याबरोबर जशी त्याची प्रकाश दीप्ती येतेच, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाबरोबर त्याची चित्शक्ती, कृष्णशक्ती भूमंडळावर विदर्भ देशात रुक्मिणी म्हणून अवतीर्ण झाली. आपण विसरता कामा नये की रुक्मिणी ही विदर्भात जन्माला आली, म्हणजे महाराष्ट्र कन्या आहे. तिचे माहेर महाराष्ट्रात आहे. तर भगवान श्रीकृष्ण हे महाराष्ट्राचे जावई आहेत.

Ad. देवदत्त परुळेकर