|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रस्सायनशास्त्र

रस्सायनशास्त्र 

रस्सा शब्दाचा ढोबळ पुस्तकी अर्थ ‘पातळ भाजी’. पण तो अपुरा आहे. रस्सा म्हणजे निव्वळ पातळ भाजी नाही. त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे. रस्सा ही संस्कृती आहे. तिचे पोळी, भाकरी, पुरीशी जमत नाही. फिरंगी पावाबरोबर आणि बारीक चिरलेल्या कांदा-कोथिंबिरीबरोबरच तिची चव खुलते. लिंबाच्या रसाचे चार थेंब या चवीत चार चांद लावून जातात. केडर बेस्ड पक्षात कार्यकर्त्यांच्या नेटवर्कचे जे महत्त्व, तेच मिसळीत रश्शाचे महत्त्व. राष्ट्रीय नेता कितीही देखणा, उत्तम वक्ता असो, निवडणुकीतला विजय कार्यकर्त्यांच्या नेटवर्कवर अवलंबून असतो. मिसळीतले चिवडा-पोहे-बटाटा वगैरे कितीही दर्जेदार असले तरी तिची लोकप्रियता रश्शाच्या दर्जावर अवलंबून असते.

रस्सा तुमच्यात गटबाजी लावून देतो. चिंचगुळाचा आंबट-गोड रस्सा आवडणारे रविवारी एका हॉटेलात जमतात. ओला नारळ-टोमॅटोचा तिखट रस्सा आवडणारे दुसऱया हॉटेलात गर्दी करतात. मोड न आलेली मटकी आणि गरम मसाले वापरून केलेला झणझणीत काळा रस्सा आवडणाऱयांचा ठिय्या तिसरीकडे असतो. हे फक्त ढोबळ प्रकार झाले. यांचे अनंत उप-उपप्रकार असतात. रश्शाबरोबर मिळणारी आणि त्याला साजणारी मिसळ प्रत्येक ठिकाणी वेगळी असते.

रश्शाच्या काही चमत्कारिक आठवणी आहेत. शाळेत असताना एका नातलगाचे निधन झाले होते. का कोण जाणे, नंतर आळंदीला मोठय़ा माणसांनी मलाही नेले. धार्मिक विधींनंतर परतताना एका टपरीवजा उपाहारगृहात थांबलो. तिथे बहुधा एकच पदार्थ मिळत असावा. आम्ही बसल्यावर वेटरने प्रत्येकाच्या पुढय़ात प्लेट्स मांडल्या. एका वाडग्यात तळलेला वडा, त्यावर ओतलेला मटकीचा लालबुंद तिखट रस्सा आणि वरून पेरलेली कांदा-कोथिंबीर-बारीक शेव. बरोबर गोल पाव. पुढे मोठेपणी आळंदीला अनेकदा गेलो. पण ते उपाहार गृह सापडले नाही. चव मात्र जिभेच्या लख्ख स्मरणात आहे.  के. ई. एम. रुग्णालयाच्या कॅण्टीनमध्ये उकडलेला हरभरा आणि मालवणी मसाला वापरून केलेला रस्सा मिसळीबरोबर देतात. ते प्रकरण आवडले म्हणून मॉर्निंग वॉकपश्चात लागोपाठ काही दिवस गेलो होतो. तर तिथल्या कॅशियरचा गैरसमज झाला. त्याने आस्थेने विचारले, “तुम्ही नेहमी येता, तुमचे कोणी नातलग आजारी आहेत का?’’  विजोड जोडपी दिसली की आपण मनातल्या मनात त्यांची पुनर्रचना करतो. तद्वत पुण्यातल्या बेडेकरांची कोरडी मिसळ आणि श्रीकृष्णचा रस्सा घरी आणतो, त्यांचा गांधर्व विवाह लावतो तेव्हा माझी जिव्हादेवी प्रसन्न आणि तृप्त होते.