|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मायेच्या पुतापायी…

मायेच्या पुतापायी… 

केरळातील कोल्लम येथील गोकूळ श्रीधर या युवकाने आपल्या आईच्या दुसऱया विवाहानिमित्त तिला शुभेच्छा देणारी फेसबुक पोस्ट लिहिली असून ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या मुलाच्या भविष्याकडे पाहून अनेक वर्षे गोकूळ श्रीधरच्या आईने आपल्या पहिल्या पतीकडून अनेक हालअपेष्टा सोसल्या, त्याचा मार खाऊनही ती तो सोसत राहिली. पण, एक वेळ अशी आली जेव्हा मुलासह तिला तिचे घर सोडावे लागले आणि आयुष्याच्या एका वळणावर तिला योग्य जोडीदारही मिळाला. त्या दोघांच्या छायाचित्रांसह गोकूळ श्रीधर याने आईला दिलेल्या शुभेच्छा आणि त्यातील भावनिक लेखनाने नेटकऱयांना भावूक बनविले आहे. त्याच्या आणि त्याच्या आईच्या या निर्णयाचे स्वागतही होऊ लागले आहे. आपल्या आईच्या विवाहाबद्दल जाहीर करावे की न करावे, लोक काय म्हणतील, हा निर्णय लोकांच्या पसंतीस उतरेल की नाही, लोक संशयी, दया कि व्देशाच्या नजरेतून या घटनेकडे पाहतील? या चिंतेतच त्याने त्याबद्दल लिहिले होते. पण, लोकांकडून त्याला सकारात्मकच प्रतिसाद आला. यात लपवण्यासारखं काहीच नाही. पण, ज्यांची विचारसरणीच छोटी आहे, त्यांनी हा मजकूर वाचलाच पाहिजे अशाही प्रतिक्रिया लोकांकडून आल्या आहेत. केरळ सारख्या सुशिक्षित बहुल राज्यातील एका मुलालाही आपल्या आईच्या या निर्णयाबद्दल जाहीर करताना दहादा विचार करावा लागतो, कारण, समाजात अशा विषयांना स्विकारण्याची मानसिकता असणाऱयांची संख्या कमी आहे असे भासत असते. याचा अर्थ समाजाला हा बदल मान्य नसतो अशातला भाग नाही. पण, आपण समाजात एकटे पाडले जाऊ किंवा कोणाच्यातरी संतापाचे बळी पडू अशी भिती असते. एखादा छोटा समूह खूप मोठा गहजब माजवून बहुसंख्य समाजाच्या आतल्या आवाजाला दाबत असतो. भारतातील अनेक सामाजिक सुधारणा या अशाच दबावामुळे अडल्या आहेत. पण, त्याबद्दल उघडपणे बोलायचे कोण? निर्णय कोण घेणार आणि कोण त्यादृष्टीने पाऊले टाकणार हा प्रश्नच असतो. कायदा आणि कायदे मंडळाची ठाम भूमिका येथेच फार महत्वाची असते आणि त्यासाठी कायदाकर्त्यांना भानावर आणणारा सामाजिक दबाव निर्माण होणेही गरजेचे असते. यादृष्टीने गोकूळ श्रीधरची फेसबुक पोस्ट लक्षात घेतली आणि ती संपूर्ण देशभर गाजण्याचे कारण लक्षात घेतले तर समाजातील ज्या घटकाला हा बदल आवश्यक वाटतो त्या प्रत्येकाने ही पोस्ट आपापल्या भाषेत कशी येईल, आपल्या मित्र मंडळींमध्ये यावर चर्चा कशी घडेल याचा विचार केलेला दिसतो आणि त्यामुळेच केरळच्या एका कोपऱयात घडलेली ही घटना देशभरात चर्चेला आलेली आहे. गोकूळ श्रीधर याच्या या पोस्टचे वाचणारा प्रत्येकजण समर्थन करतो आहे, आणि त्यामुळेच लोक त्याच्या बाजुने बोलू लागले आहेत. समाज माध्यमांचा हा एक सर्वात मोठा फायदा आहे. इथे जसे विरोधक मिळतात तसे जगाच्या कानाकोपऱयातून समर्थकही मिळतात. एखाद्या विचाराला प्रभावी बनविण्यासाठी समविचारी माणसांचा दूरदूरचा समूह एकवटू शकतो आणि त्यांच्या विचारसरणीतून हा विषय भारतासारख्या देशात चर्चेतून बदलाचे कारणही ठरू शकतो. आज घरघुती हिंसाचार ही अनेक घरात गांभिर्याने घ्यावी अशीच गोष्ट बनलेली आहे. विविध कारणांनी कुटुंबात निर्माण होणारे तणाव आणि त्याचा बळी जर एखादी स्त्री बनत असेल तर शेजारी पाजारी त्या स्त्रिविषयी सहानुभूती व्यक्त करीत असतात. मात्र ज्यावेळी ती महिला तिच्या पतीकडून किंवा कुटुंबातील प्रमुख पुरूषाकडून मारहाण सहन करत असते तेव्हा कोणीही स्त्री-पुरूष त्या कुटुंबातील कोणी बोलाविल्याशिवाय मध्ये पडत नाहीत. त्याचे कारण संशयी वृत्तीत नक्कीच आहे. अनेक कुटुंबामधील महिला अत्याचार सहन न करता घराबाहेर पडण्याचा विचार करत असल्या तरी त्या धाडस करू शकत नाहीत ते केवळ आणि केवळ त्यांच्या पदरी असलेल्या मुलांमुळे. मुले मोठी होईपर्यंत हा त्रास सहनच करावा लागणार असा विचार करून त्या अन्याय सहन करत असतात. मुलं मोठी होतील आणि आपलाही पांग फिटेल, मुले बंड करून घराबाहेर पडतील किंवा आपला त्रास थांबवतील असा विचार करतच त्या जगतात-मरतात. विवाह विच्छेदनाच्या कायद्यांमध्येही स्त्रिला आवश्यक तितकी सुरक्षितता नाही. मुले लहान असतील आणि त्यांच्यासह तिला पतीपासून वेगळे व्हायचे असेल तर तिची मुले सांभाळण्याची ऐपत नाही या एका कारणानेही तिला मुलांपासून वेगळे व्हावे लागू शकते. पतीकडून मिळणाऱया पोटगीसाठी तिला वर्षानुवर्षे कोर्टात झगडत रहावे लागू शकते आणि ती मंजूर झाली तरी मिळेलच याची खात्री नसते. कुटुंबात एकत्र असताना मारहाण करणारा व्यक्ती वेगळे झाल्यानंतर त्या महिलेच्या उपजिविकेसाठी वेळेवर पैसे देईल याची काहीही खात्री नसतानाही तसे आदेश दिले जातात हे आपल्या न्याय व्यवस्थेचे केवळ अपयशच नव्हे तर त्यावर अद्यापपर्यंत काही प्रभावी तोडगा न निघणे हा कायद्याचा पराभवच आहे. कायदा पराभूत झाल्यामुळे त्याच्यावर आस लागून असलेली स्त्राrही लढण्यापूर्वीच पराभूत झालेली असते. त्यामुळेच गोकूळ श्रीधरच्या आईने ती लढाई न करता मार खात जगणे पसंत केले. पण, जेव्हा कधी तिने बंड केले तेव्हा तिला तिच्या मुलानेही समजून घेतले.  तिच्या स्वप्नांना साथ देणारा नवा जोडीदार तिला घर सोडल्यानंतर मिळालाच. पण, प्रत्येकीच्याच आयुष्यात असे घडेल असे नाही. सोसणाऱया प्रत्येक स्त्रिच्या बंडाचा सन्मान समाजात व्हायला हवा. त्यांच्याकडे संशयाने पाहण्यापेक्षा त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि तो बजावण्यासाठी आपण किमान विचारांचे पाठबळ देऊ शकतो, ते दिलेच पाहिजे आणि असा विवाह करणाऱया महिलांना सन्मान दिला पाहिजे असे वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा मुलांच्या भविष्यासाठी म्हणून दबून राहणाऱया स्त्रियांच्या जीवनात एक आशेची सकाळ उजाडेल. त्यादृष्टीने केरळच्या दिशेला झुंजुमुंजू झालं आहे. केरळातून मान्सून भारतात येतो तसाच नवविचारांचा हा मान्सून लवकरात लवकर भारतभर पसरो आणि अशा स्त्रियांच्या पाठिशी राहून त्यांच्या आयुष्याचे नवअंकुर फुलायला मदत करो. या गुलामगिरीतून स्त्रीची मुक्तता हेवो याच सदिच्छा.