|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची

चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची 

स्वाभिमानी प्राथमीक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघातर्फे पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

प्रतिनिधी/ कोल्हापूर

विद्यार्थ्याच्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. विद्यार्थ्याचे जीवन घडवण्याचे महत्वाचे काम हे शिक्षकांचे असून विद्यार्थ्यामधून चांगला नागरिक घडावा यासाठी त्याचे ज्ञान अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी शिक्षकांची असते त्यांनी ती पेलली पाहिजे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी केले. स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघातर्फे मंगळवारी शाहू स्मारक येथे शिक्षक व समाजसेवक गौरव पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी आडी देवस्थानचे परमात्मराज महाराज होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील चांगली कामगिरी केलेले शिक्षक, संस्था, पत्रकार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

  कुलगुरू डॉ.शिंदे म्हणाले,विद्यार्थ्याच्या अंगभुत गुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय. तो विकास साधण्याचे काम शिक्षक मंडळी करत असतात. विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास साधण्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षकांची असते. आज काही पत्रकार मंडळींचाही गौरव झाला आहे. समाजाला दिशा देण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवावे. परमात्मराज महाराज म्हणाले, माणसाला अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार असतो. शिक्षण आणि पत्रकारीता हे क्षेत्र समाजसेवेचे आहे. त्याच्याशी प्रत्येकाने इमान राखावा. यावेळी शेखर चरेगावकर यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री-शिक्षणमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तर सुरेश आवरे यांनी बोर्डाच्या निकालात होत असलेली घसरण चिंतेची बाब असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.

  दरम्यान मान्यवरांच्या हस्ते शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंडळींचा शिक्षक व समाजसेवक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यातील समाजसेवक पुरस्कारामध्ये तरुण भारतच्या अहिल्या परकाळे, सुरेश पाटील यांना कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याचबरोबर पत्रकार प्रविण मस्के, उदय देशमुख यांचाही गौरव करण्यात आला. तर आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सेंट झेवियर्स हायस्कुलला देण्यात आला. जिवन गौरव पुरस्कार जीवन साळोखे यांना देण्यात आला. यावेळी शिक्षक, प्राचार्य, प्राध्यापक यांनाही गौरवण्यात आले. स्वागत-प्रास्ताविक संस्थापक सुधाकर निर्मळे यांनी केले. आभार भास्कर चंदनशिवे यांनी मानले.

  यावेळी सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगांवकर, शिक्षण उपसंचालक सूरेश आवरी, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, शिक्षक नेते एस.डी.लाड, अर्जुन पाटील, गौतम वर्धन, राजेंद्र माने, अभिजीत गायकवाड, मिलींद बारवडे, भाऊसाहेब सकट, डी.ए.जाधव, संजय मगदुम यांची प्रमुख उपस्थिती होती