|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नियमकालिक स्पर्धेत विवेकानंद पाचव्यांदा प्रथम

नियमकालिक स्पर्धेत विवेकानंद पाचव्यांदा प्रथम 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

सातत्यपूर्ण यशाची परंपरा याही वर्षी कायम राखत कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजच्या विवेक नियतकालिकाने शिवाजी विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत बिगर व्यावसाईक गटामध्ये पाचव्यांदा प्रथम क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.  यापूर्वी या महाविद्यालयाने या स्पर्धेत पाचवेळा प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

हा पुरस्कार सोहळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली  व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ एस वाय होनगेकर  व ‘विवेक’चे संपादक प्रा. बी. के. गोसावी यांना सन्मानपूर्वक शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेसाठी दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा फिरता चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, नियतकालिक  स्पर्धेविषयी माहिती देत  शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कला व साहित्य लेखनाविषयी अभिरुची निर्माण करण्याच्या दृष्टीने अधिक दर्जेदार नियतकालिके निघाली पाहिजेत. या नियतकालिकांचे ऑनलाईन प्रसारण होऊन ते समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. वाचनसंस्कृती जगण्यासाठी असा प्रयोग करणे गरजेचे आहे.  प्राचार्य डॉ. होनगेकर म्हणाले,  गेली पाच वर्षे या महाविद्यालयाने विवेक नियतकालिक स्पधेत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱया लेखन, कला साहित्य गुणांच्या विकासाला चालना मिळाली आहे. विद्यापीठाने अशा गुणी विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक यथोचित सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विवेकानंद कॉलेजच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी विवेक संपादक मंडळ व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.