|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खेर्डी सरपंचाविरोधात ‘अविश्वास’ मंजूर!

खेर्डी सरपंचाविरोधात ‘अविश्वास’ मंजूर! 

प्रतिनिधी/ चिपळूण

  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्या पत्नी खेर्डीच्या सरपंच जयश्री खताते यांच्याविरोधातील अविश्वास ठराव बुधवारी झालेल्या विशेष सभेत 13 विरूध्द 2 अशा मतांनी मंजूर झाला. त्यामुळे खेर्डी ग्रामपंचायतीवरील गेल्या 14 वर्षांपासून असलेली खताते यांचे एकहाती वर्चस्व संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादीच्याच काही सदस्यांनी शिवसेनेच्या सदस्यांना बरोबर घेत खतातेची सत्ता उलथवली आहे. या घडामोडीने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

  राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया खेर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री खताते यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी विरोधी शिवसेना सदस्यांच्या साथीने 6 जून रोजी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. विकासकामांत सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे अशी कारणे त्यासाठी देण्यात आली होती.

   या ठरावानुसार तहसीलदार जीवन देसाई यांनी बुधवारी विशेष सभा घेतली.  जरीना चौगुले आणि नयना शिगवण या दोन सदस्या गैरहजर होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे दशरथ दाभोळकर यांनी अविश्वास ठराव मांडला, त्याला शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ फाळके यांनी अनुमोदन दिले. यावरील चर्चेत पाथरूड, साळवी यांनी आपली मते मांडली. त्यावर सरपंच खताते यांनी खुलासा केला. ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच 12 मतांची गरज असताना प्रत्यक्षात ठरावाच्या बाजूने प्रकाश साळवी, दशरथ दाभोळकर, प्रकाश पाथरूड, विश्वनाथ फाळके, सुनील दाते, देविका डिके, विकल्पा मिरगल, अवंतिका खरावते, विनिता मोहिते, प्राची शिर्के, गजानन जाधव, विनय दाते आणि प्रसाद सागवेकर अशा 13 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले, तर ठरावाच्या विरोधात सरपंच जयश्री खताते, प्रियांका भुरण या दोघींनीच मतदान केले. त्यामुळे खतातेंवरील अविश्वास ठराव 13 विरूध्द दोन मतांनी मंजूर झाला.

फटाक्यांची आतषबाजी

  अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर अज्ञातस्थळी गेलेले 13 सदस्य बुधवारी विशेष सभेला थेट ग्रामपंचायतीत दाखल झाले. अविश्वास ठराव मंजुरीनंतर सारे सदस्य अनिल दाभोळकर यांच्या निवासस्थानी पोहचले. तेथे फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

  खतातेंच्या कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी

  अविश्वास ठरावानंतर खेर्डीत खताते यांच्या कार्यालयात त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी असतानाही खताते यांच्या कार्यालयात खताते यांच्याबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप माटे वगळता राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी, जबाबदार कार्यकर्ता उपस्थित नव्हता.

पोलीस बंदोबस्त

 खेर्डी हे संवेदनशील असल्याने या अविश्वास ठरावावेळी ग्रामपंचायत कार्यालय आणि बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

  अपिलासाठी सात दिवसांची मुदत

 अविश्वास ठराव मंजूर झाला असला तरी पुढील प्रक्रियेत जिल्हाधिकाऱयांकडे अपिल करण्यासाठी सात दिवसांची मुदत आहे. तेथील निर्णयानंतर पुढे विभागीय आयुक्तांकडे जाण्यासाठीही संधी आहे. या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर सरपंच निवडणूक घेतली जाणार असल्याचे तहसीलदार देसाई यांनी स्पष्ट केले.

 अविश्वास ठरावानंतर पुढे काय…?

  सरपंच जयश्री खतातेंविरोधात 13 विरूध्द 2 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे. 17 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेकडे सात, तर राष्ट्रवादीकडे 8 सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यापुढील सरपंच नेमका कोणाचा हे गुलदस्त्यात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन्ही गट एकत्र बसून सरपंचपदावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे पुढे येत आहे.  

 आपला अन् परका कोण हे समजलं

   अविश्वास ठरावाला सामोरे जाताना अपयश आले असले तरी यातून बरेच काही शिकायला मिळाले. खेर्डीतच नव्हे तर तालुक्यात, राष्ट्रवादी पक्षात आपले कोण आणि परका कोण हे या सर्व घडामोडीतून समजलं. ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱयांकडे अपिल करण्याबाबत वकिलांचा सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.