|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रत्नागिरी कारागृहातून कैदी पसार

रत्नागिरी कारागृहातून कैदी पसार 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह प्रशासनाच्या हातावर तुरी देत जन्मठेपेची शिक्षा भोगणार कैदी पसार झाल्याची घटना मंगळवारी घडली. चांगल्या वर्तवणुकीच्या कैद्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ओपन जेल’ संकल्पनेला या प्रकारामुळे धक्का बदसला आहे. बागकाम करत असताना कर्मचाऱयांच्या हातावर तुरी देत त्याने पलायन केल्याने कारागृह प्रशासनाच्या पायाखालची जमिन सरकली आहे.

  याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहाबाहेरील बागेत काम करणार रुपेश तुकाराम कुंभार (39, रा. वेळंब-कुंभारवाडी, गुहागर) हा कैदी फरार झाला आहे. मंगळवारी भर दुपारी 1.15 ते 1.45 च्या दरम्यान ही घटना घडली. त्याला पकडण्यात जेल पोलीसांसह जिल्हा पोलीसांना अपयश आले आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात कुंभार विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  कारागृहातून पलायन केलेला रुपेश कुंभार हा 2006 मध्ये एका रिक्षा व्यावसायिकाचा निघृण खून प्रकरणात जन्मपेठेची शिक्षा भोगत होता. सुरूवातीला रूपेशला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. नाशिक कारागृहातील रुपेशच्या चांगल्या वर्तवणुकीमुळे त्याला 27 ऑक्टोबर 2018 रोजी रत्नागिरी विशेष कारागृहात पाठवण्यात आले.

  जिल्हा विशेष कारागृह प्रशासन चांगल्या वर्तवणुकीच्या गुन्हेगारांसाठी ‘ओपन जेल’ची संकल्पना राबवत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कारागृहाच्या आवारात विविध प्रकारची कृषी उत्पादने ओपन जेलच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. यामध्ये रुपेश कुंभारची निवड करण्यात आली. अन्य कैदय़ांसोबत रुपेशचे वागणे-बोलणेही चांगले असल्याने त्याच्याबाबत कर्मचाऱयांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. मात्र रूपेशने मंगळवारी विश्वासघात केला.

   मंगळवारी दुपारी रुपेश कुंभार कारागृहाच्या बगिच्यामध्ये नेहमीप्रमाणे कृषीकाम करण्यासाठी गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास सुमारास कारागृह पोलीस कर्मचारी आर. व्ही. यादव यांना प्रसाधनगृहात जातो असे सांगून तो गेला. मात्र  बराचवेळ होऊनही परत न आल्याने त्याचा शोध सुरू झाला. त्यावेळी तो पसार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱयांची धावाधाव करत कारागृह प्रशासनाला खबर दिली. त्यानंतर जिल्हा पोलिसांनाही याबाबत माहिती दिल्यानंतर शोधमोहिम गतीमान करण्यात आली. मात्र तो सापडू शकला नाही.

   रुपेश कुंभार पसार झाल्याची तक्रार कारागृह प्रशासनातील आर. व्ही. यादव यांनी शहर पोलिसांकडे दाखल केली. मात्र ही तक्रार उशिराने दाखल केल्यामुळे तपासकार्यालाही उशिर झाला. रूपेशने दहा वर्षे आठ महिने चौदा दिवस शिक्षा भोगली होती. तर 2 वर्षे 8 महिने 13 दिवस न्यायाधिन कालावधी होता. त्याच्या फरार होण्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

चार वर्षांपूर्वी अन्य कैद्याचे पलायन

जिल्हा विशेष कारागृहातून यापुर्वी अनुज कुमार नामक कैद्याने चार वर्षांपूर्वी पलायन केले होते. कारागृहातील कर्मचाऱयांची नजर चुकवून बराकमधून बाहेर पडत आणि कारागृहाची उंच भिंत ओलांडून तो पसार झाला होता. त्या घटनेत काही कर्मचाऱयांना निलंबीतही करण्यात आले होते. चार वर्षांनी पुन्हा एकदा पलायनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.