|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार

भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार 

पश्चिम बंगालमधील राजकीय वाद चिघळणार : कोलकाता पोलिसांकडून अश्रूधूराचाही वापर

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी आणखी एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आल्यावर राज्यातील तणावात भर पडली आहे. सातत्याने होणाऱया हिंसाचाराच्या विरोधात भाजप कार्यकर्ते बुधवारी ममता बॅनर्जी सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. कोलकाता येथील पोलीस मुख्यालयाच्या दिशेने जाऊ पाहणाऱया भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रूधूराचाही वापर केला आहे. तसेच पाण्याचा मारा करत भाजप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीपासूनच राज्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मालदामध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह आढळल्यावर तणावात आणखीनच भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या हत्येमुळे नाराज भाजप समर्थकांच्या संतापात मोठी भर पडली आहे.

ममता सरकारविरोधात आंदोलन

राजधानी कोलकातामध्ये संतप्त भाजप समर्थकांनी रस्त्यावर धाव घेत ममता सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. स्वतःची नाराजी व्यक्त करण्यासाठी पेलीस मुख्यालयाला घेराव घालण्याकरता पुढे सरकणाऱया भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत करावी लागली.

हत्यांमुळे वाढला वाद

तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्हय़ाच्या कांकीनारा येथे मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्ष सुरू आहे. उत्तर 24 परगणा येथील हिंसाचारानंतर या वादाने उग्र रुप धारण केले आहे. संघ तसेच भाजपच्या प्रत्येकी एक कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकविलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या दोन्ही कार्यकर्त्यांच्या हत्येमागे तृणमूलचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. राजभवनात गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता होणाऱया या बैठकीसाठी राज्यातील सर्व पक्ष म्हणजेच तृणमूल काँग्रेस, भाजप, माकप, काँग्रेसला निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

ममतांचे हिंसाचाराला प्रोत्साहन

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतःच राज्यातील हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी केला आहे. हिंसाचाराकरता तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांचा वापर केला जातोय. हिंसाचार घडवून आणणाऱयांचा रोहिंग्या मुस्लिमांशी संपर्क असल्याचा दावाही सुप्रियो यांनी केला आहे.