|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नव्या प्रत्यार्पण कायद्याला हाँगकाँगवासीयांचा विरोध

नव्या प्रत्यार्पण कायद्याला हाँगकाँगवासीयांचा विरोध 

जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूराचा वापर

वृत्तसंस्था/ हाँगकाँग

हाँगकाँगमध्ये प्रस्तावित नव्या प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात जनतेने बुधवारीही आंदोलन केले आहे. रस्त्यांवर उतरलेल्या हजारो निदर्शकांनी पूर्ण शहराची वाहतूकच रोखून धरली आहे. प्रशासन कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱया जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रूधूराचा वापर केला आहे.

प्रस्तावित प्रत्यार्पण कायदा रद्द करण्याच्या मागणीवरून शनिवारीही लाखो लोकांनी निदर्शने केली होती. परंतु त्यांची मागणी फेटाळत चीन समर्थक हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांनी प्रत्यार्पण कायदा मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रत्यार्पण कायदा

प्रस्तावित कायद्यात आरोपी आणि संशयितांना चीनमध्ये प्रत्यार्पित करण्याची तरतूद आहे. या कायद्यामुळे हाँगकाँगची स्वायत्तता आणि नागरिकांचे अधिकार धोक्यात येतील असे तज्ञांचे म्हणणे आहे. निदर्शकांमध्ये युवक आणि युवतींचे प्रमाण अधिक होते.