|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर प्रदेश बार कौन्सिल अध्यक्षांची आग्रा येथे हत्या

उत्तर प्रदेश बार कौन्सिल अध्यक्षांची आग्रा येथे हत्या 

आग्रा

 उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षा दरवेश यादव यांची त्यांच्या सहकारी वकिलानेच आग्रा येथील सत्र न्यायालयाच्या आवारात गोळय़ा झाडून निर्घृण हत्या केली. दोन दिवसांपूर्वीच दरवेश यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. आग्रा जिल्हा न्यायालयात कार्यक्रमासाठी येत असताना त्यांच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या. मनीष शर्मा असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. हल्ल्यानंतर त्याने गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरवेश यादव या मूळच्या इटाहच्या रहिवासी आहेत. उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड होणाऱया त्या पहिल्या महिला होत्या.

अध्यक्षपदी निवड झाल्याने दरवेश यादव यांच्या स्वागत समारंभासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी न्यायालयात येत असताना मनीषने त्यांच्यावर तीन गोळय़ा झाडल्या, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक अजय आनंद यांनी दिली. हत्येनंतर तणाव वाढला असून वकिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.