|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कार झाडावर आदळून पितापुत्र ठार

कार झाडावर आदळून पितापुत्र ठार 

महामार्गावर सलग तिसऱया दिवशी अपघात; तीन जखमी 

प्रतिनिधी/ उंब्रज

आशियाई महामार्गावर कराड परिसरात अपघाताची मालिका सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत मलकापूर व मालखेड येथे अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तिसऱया दिवशी वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणारी महिंद्रा कार निलगिरीच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात वकील पुत्रासह पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  अपघातात चौघे जखमी झाले आहेत. चालकाच्या हलगर्जीपणामुळे सदरचा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अपघातात ऍड. राजकुमार हरी पोळ (वय 46), हरी भाऊ पोळ (वय 64, दोघे सध्या राहणार मलकापूर, ता. कराड, मुळ राहणार अकलूज, ता. माळशिरस)  अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. हिना राजकुमार पोळ (वय 35), आदित्य राजकुमार पोळ (वय 13, राहणार मलकापूर), कारचालक किसन गणपती खापे (वय 54, विरवडे) हे जखमी झाले आहेत. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

       सदर अपघाताबाबत तळबीड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोळ कुटुंबीय मंगळवारी रात्री पुण्यावरून कराडकडे येत होते. त्यांच्या महिंद्रा केयुव्ही कारमधून ऍड. पोळ यांची पत्नी, दोन मुले, वडील असे प्रवास करीत होते.  तर किसन खापे हे कार चालवत होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत कार आल्यानंतर चालकाच्या हलगर्जीपणामुळे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याकडेच्या निलगिरीच्या झाडावर आदळली व महामार्गावर उलटय़ा दिशेला येऊन थांबली.  सदर अपघातात ऍड. राजकुमार पोळ यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे वडील हरिभाऊ पोळ हे गंभीर जखमी होऊन त्यांचाही मृत्यू झाला.  सदर अपघातात ऍड. पोळ यांची पत्नी हिना पोळ तसेच त्यांचा मुलगा आदित्य  हा जखमी झाला असून मुलगी आरोही (वय 5) ही सुदैवाने बचावली. तसेच अपघातात चालक किसन खापे हाही जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  मुळचे अकलूज येथील पोळ कुटुंबीय व्यवसायानिमित्त मलकापूर येथे वास्तव्यास आहे. राजकुमार पोळ कराड न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करतात. त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून रात्री उशिरा अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.