|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ब्रिटन न्यायालयाचाही नीरव मोदीला झटका

ब्रिटन न्यायालयाचाही नीरव मोदीला झटका 

वृत्तसंस्था/ लंडन

पीएनबी घोटाळय़ातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावत जोरदार झटका दिला आहे. रॉयल कोर्ट ऑफ जस्टीसमधील न्यायाधीश इंग्रिड सिमलर यांनी हा निर्णय दिला आहे. बुधवारी याबाबतची सुनावणी झाली.

नीरव मोदी आत्मसमर्पण करण्याची शक्यता नाही. तसेच तो या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव टाकून पुराव्यांमध्येही हेराफेरी करु शकतो, असे सिमलर यांनी टिप्पण्णी केली आहे. उच्च न्यायालयाआधी वेस्टमिन्स्टर न्यायालयातील न्यायाधीशांनीही तीनवेळा नीरव मोदीचा अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर नीरवने 31 मे रोजी उच्च न्यायालयात अर्ज करत वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने नीरवला चांगलाच झटका बसला आहे.

फरार नीरव मोदीला 19 मार्च रोजी अटक केल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून लंडनमधील कुख्यात वँडसवर्थ तुरुंगामध्ये आहे. उच्च न्यायालयात नीरवची बाजू त्याचे वकील क्लेअर मोन्टगोमेरी यांनी मांडली. नीरवला जामीन मिळाल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता इलेक्ट्रॉनिक चीप किंवा डिव्हाईसने त्याच्यावर लक्ष ठेवावे, अशी विनंतीही केली. त्याच्या मुलांच्या शिक्षणाकरता तो पैसे कमवण्यासाठी लंडनला आहे, असेही म्हणणे मांडले. परंतु सरकारी वकिलांनी नीरवने कर्जाचा व्यवहार बनावट भागीदार दाखवून केला असून फसवणूक केल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याला जामीन मिळाला तर तो पुरावे बदलू शकतो, तसेच साक्षीदारांवर दबावही आणू शकतो, असा युक्तिवाद केला. तो न्यायालयाने मान्य करत नीरवचा जामीन फेटाळला.