|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एनआयए’चे तामिळनाडूत छापे

एनआयए’चे तामिळनाडूत छापे 

श्रीलंका बॉम्बस्फोटप्रकरणी कोइम्बतूरमध्ये सात ठिकाणी कारवाई

वृत्तसंस्था/ चेन्नई

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने बुधवारी तामिळनाडूतील कोइम्बतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस) संपर्कात असणाऱया चार जणांना अटक केली. तामिळनाडूत यापूर्वीही एनआयएने 10 ठिकाणी छापे टाकले होते. तसेच चेन्नईमध्येही शोधमोहीम राबवली होती.

 21 एप्रिल रोजी श्रीलंकेमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटात 11 भारतीयांसमवेत 285 जण ठार झाले होते. हल्ल्याचा सूत्रधार जहरान हाशिम याचा फेसबुक पेंडसह अन्य चौघांचे वास्तव्य कोइम्बतूर येथे असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली. तसेच श्रीलंकेकडूनही याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार ‘एनआयए’ने संशयितांवर गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली. बुधवारी सात ठिकाणी छापे टाकले. चार संशयित दहशतवाद्यांना अटक असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट ‘आयएस’ने घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांचे वास्तव्य केरळमध्ये असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानुसार ‘एनआयए’ने केरळमधील कासरगोड आणि पलक्कडमधील चार घरांची झडती घेतली. 28 एप्रिल रोजी कासगोडमध्ये तिघांना अटक केली होती. संशयित आरोपींकडे फरार असणारा कथित धर्मगुरू झाकीर नाईक याच्या भाषणाच्या सीडी आणि अन्य डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती.