|Friday, August 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नव्या तलाकविरोधी विधेयकाला संमती

नव्या तलाकविरोधी विधेयकाला संमती 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, संसदेत सादर करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

तोंडी तलाकच्या धास्तीत सतत वावरणाऱया मुस्लीम महिलांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नवे तिहेरी तलाकविरोधी विधेयक संमत केले आहे. हे विधेयक आता संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. हा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

तिहेरी तलाकविरोधी विधेयक गेल्या लोकसभेत संमत करण्यात आले होते. तथापि, ते राज्यसभेत विरोधी पक्षांनी सहकार्य न केल्याने संमत होऊ शकले नाही. आता सोळाव्या लोकसभेचा कालावधी संपल्यामुळे ते विधेयक वाया गेले. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने नवे विधेयक तयार करून त्याला संमती दिली. आता ते पुन्हा संमतीसाठी लोकसभा आणि राज्यसभेत सादर केले जाणार आहे.

केंद्र सरकारने तत्काळ तिहेरी तोंडी तलाकपासून मुस्लीम महिलांचे संरक्षण करण्यासाठी केंद्राने 2019 मध्ये एक अध्यादेश क्रियान्वित केला होता. त्याचा कालावधीही आता संपत आला आहे. त्यामुळे नवे विधेयक आवश्यक झाले आहे, असे सांगण्यात आले. या विधेयकाला आता विरोधक राज्यसभेत पाठिंबा देतात का हे पहावे लागणार आहे. लोकसभेत सरकारजवळ पुरेसे बहुमत असल्याने तेथे ते सहजगत्या संमत होणार आहे. विरोधकांच्या धर्मनिरपेक्ष बाण्याचीही कसोटी राज्यसभेत या विधेयकाच्या निमित्ताने लागेल अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली.