|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » जर्मनी, इटली, फ्रान्स संघांचे विजय

जर्मनी, इटली, फ्रान्स संघांचे विजय 

वृत्तसंस्था/ मेंझ

2020 च्या युरो चषक पात्रफेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी येथे झालेल्या सामन्यात जर्मनीने इस्टोनियाचा पराभव केला तर फ्रान्सने अँडोराचा तसेच इटलीने बोस्नियाचा पराभव करत पूर्ण गुण वसुल केले. लुकाकुने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर ब्रुसेल्समध्ये झालेल्या सामन्यात बेल्जियमने स्कॉटलंडचे आव्हान संपुष्टात आणले.

क गटातील सामन्यात जर्मनीने इस्टोनियाचा 8-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात पूर्वार्धात जर्मनीने 27 मिनिटांच्या कालावधीत पाच गोल नोंदविले. क गटात आता जर्मनीने 3 सामन्यांतून 9 गुणांसह दुसरे स्थान मिळविले असून या गटात नॉर्दन आयर्लंड 12 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. नॉर्दन आयर्लंडने आपले चारही सामने जिंकले आहेत. मंगळवारच्या एका सामन्यात नॉर्दन आयर्लंडने यजमान बेलारूसचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल पॅडी मॅक्नेरने 86 व्या मिनिटाला नोंदविला. जर्मनीचा आता या गटातील पुढील सामना हॉलंड बरोबर होणार आहे.

च गटातील मंगळवारी झालेल्या सामन्यात फ्रान्सने अँडोराचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव करून या गटात पुन्हा आघाडीच्या स्थानावर झेप घेतली आहे.  फ्रान्सतर्फे या सामन्यात एम्बापेने 11 व्या मिनिटाला खाते उघडले. 20 वर्षीय एम्बापेच्या फुटबॉल कारकीर्दीतील हा 100 वा गोल ठरला आहे. च गटात फ्रान्सने सरस गोल सरासरीच्या गोलावर पहिले स्थान मिळविले आहे. फ्रान्स आणि तुर्की यांनी प्रत्येकी समान 9 गुण मिळविले असून आईसलँडने तिसरे स्थान घेतले आहे. आईसलँडने तुर्कीचा 2-1 तर अल्बेनियाने माल्डोव्हाचा 2-0 असा पराभव केला.

जे गटातील टय़ुरिन येथे झालेल्या सामन्यात इटलीने बोस्नियाचा 2-1 असा पराभव केला तर अर्मेनियाने ग्रीसला पराभवाचा धक्का दिला. इटलीने या गटात आपले चारही सामने जिंकून आघाडीचे स्थान मिळविले आहे. फिनलँड दुसऱया स्थानावर आहेत. ग्रीसने तिसरे स्थान मिळविले आहे. आय गटातील मंगळवारी झालेल्या सामन्यात बेल्जियमने स्कॉटलंडचा 3-0 असा पराभव केला. बेल्जियमचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून त्यांनी 12 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. या गटात रशिया 9 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. रशियाने सायप्रसवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. कझाकस्तानने सॅन मॅरीनोचा 4-0 असा पराभव केला.