|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » सामना होण्याची शक्यता 30 टक्के

सामना होण्याची शक्यता 30 टक्के 

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा : भारत-न्यूझीलंड यांच्यात आज साखळी सामना

नॉटिंगहम / प्रतिनिधी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या दोन लढतीतील विजयासह दमदार आगेकूच केली आहे. मात्र, आज न्यूझीलंडविरुद्ध ही विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी विराटसेनेला पावसाची साथ लाभणेही तितकेच आवश्यक ठरणार आहे. नॉटिंगहममधील ट्रेंट ब्रिजवर हा सामना होणार आहे. पण, मागील दोन-तीन दिवसात येथे सातत्याने संततधार होत असल्याने प्रश्नचिन्ह आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार रात्री उशिरा पाऊस झाला नाही तर षटकांची कपात होत सामना खेळवला जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.

भारत व न्यूझीलंड हे दोन्ही दिग्गज संघ या विश्वचषक स्पर्धेत विशेष बहरात आहेत. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर उभयतांकडे एकापेक्षा एक, असे जागतिक दर्जाचे अव्वल खेळाडू आहेत. त्यामुळे, उभय संघात जुगलबंदी रंगणार, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, ही जुगलबंदी रंगण्यासाठी येथील खराब हवामानाचा व्यत्यय दूर होणे तितकेच महत्त्वाचे ठरेल.

भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मागील साखळी सामन्यात 36 धावांनी बाजी मारली. मात्र, त्याच दरम्यान शतकवीर शिखर धवनला अंगठय़ाची दुखापत झाल्याने तो तीन आठवडे बाहेर फेकला गेला आणि भारतासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. केएल राहुलला आतापर्यंत चौथ्या स्थानी खेळवले जात होते, तो आता रोहितच्या साथीने या लढतीत सलामीला येईल. ही लढत होऊ शकली तर केएल राहुलला न्यूझीलंडच्या तिखट माऱयाचा सामना प्रकर्षाने करावा लागेल आणि यात त्याची चांगलीच पारख होऊ शकेल.

भारतासाठी यापूर्वी मनगटी गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी ब्रेकथ्रू मिळवून दिले आहेत. पण, ट्रेंट ब्रिजवर येथे सीमारेषा अधिक लगत आहे आणि ढगाळ हवामानाची शक्यता अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर विराट मागील सामन्यातील संघच कायम ठेवणार का, हे पहावे लागेल.

गुणतालिकेत न्यूझीलंड अव्वल

सध्या गुणतालिकेत न्यूझीलंड अव्वलस्थानी असून त्यांनी आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. लॉकी फर्ग्युसन व मॅट हेन्री हे त्यांचेच दोन अव्वल गोलंदाज प्रत्येकी 15 बळींसह स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यामुळे, न्यूझीलंडची गोलंदाजी भक्कम आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय आघाडीवीरांचा येथे चांगला कस लागू शकतो. जिम्मी नीशम आणि कॉलिन डे ग्रँडहोम यांचीही फर्ग्युसन व हेन्री यांना उत्तम साथ लाभत आहे. गोलंदाजीत भक्कम पर्याय उपलब्ध असल्याने या आघाडीवर केन विल्यम्सन अर्थातच निश्ंिचत आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडचे अव्वल फलंदाज उत्तम बहरात आहेत आणि यापूर्वी जिंकलेल्या मागील तिन्ही सामन्यात त्यांनी दमदार फटकेबाजी केली आहे. पण, भारतीय गोलंदाजी देखील तगडी असल्याने लढत झाल्यास ही जुगलबंदी निश्चितच रंगू शकते. विशेषतः जसप्रित बुमराहच्या भेदक गोलंदाजीला सामोरे जाणे किवीज फलंदाजांसाठी विशेष आव्हानात्मक असणार आहे.

किवीज कर्णधार केन विल्यम्सन आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. शिवाय, फिरकी गोलंदाजीचा समाचार घेण्याची त्याची क्षमता निर्विवाद आहे. त्या पार्श्वभूमीवर, ही लढत झाल्यास जोरदार जुगलबंदी रंगेल, हे निश्चित असेल.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, विजय शंकर, दिनेश कार्तिक, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), टॉम ब्लन्डेल (यष्टीरक्षक), मिशेल सॅन्टनर, कॉलिन डे ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुन्रो, ईश सोधी, हेन्री निकोल्स, मार्टिन गुप्टील, मॅट हेन्री, जेम्स नीशम.

सामन्याची वेळ : सकाळी 10.30 पासून.  

काय सांगतो हवामानाचा अंदाज?

मागील दोन-तीन दिवसांपासून नॉटिंगहममध्ये सातत्याने संततधार होत असून स्थानिक प्रमाणवेळेनुसार आज रात्री उशिरानेही आणखी संततधारेची अपेक्षा आहे. साहजिकच 100 षटकांचा पूर्ण सामना होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. रात्री येथे पाऊस झाल्यास खेळ होण्याची शक्यता आणखी कमी होईल. मात्र, रात्री पावसाने विश्रांती घेतली व सकाळी देखील पाठ फिरवली किमान 20-20 षटकांचा सामना तरी निश्चितच होऊ शकेल. 

नाणेफेकीनंतर काय निर्णय होईल?

षटकांची कपात करुन सामना खेळवण्याचा निर्णय झाल्यास नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षणाला प्राधान्य देईल, हे निश्चित मानले जाते. येथे आज लढत होऊ शकली तरी ढगाळ हवामानाची शक्यता अधिक असेल आणि अशा परिस्थितीत आऊटफिल्ड अगदीच सर्द असेल. शिवाय, चेंडू सरळ बॅटवर येण्याची शक्यता कमीच असणार आहे. यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध लढतीत असेच हवामान असताना विंडीजला नाणेफेकीचा कौल जिंकल्याचा लाभ झाला होता. त्याची पुनरावृत्ती येथे होऊ शकते. 

चाहत्यांच्या प्रतिसादाकडेही लक्ष

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साऊथम्प्टनवर तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर सामना झाला, त्यावेळी भारतीय चाहत्यांनी अक्षरशः स्टेडियम डोक्यावर घेतले होते. येथे नॉटिंगहमवर वेगळी परिस्थिती आहे. पाऊस मागील दोन दिवसांपासून ठाण मांडून आहे. तरीही आज भारतीय चाहते स्टेडियमवर त्याच उत्साहाने दाखल होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.