|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाची पाकवर 41 धावांनी मात

ऑस्ट्रेलियाची पाकवर 41 धावांनी मात 

वृत्तसंस्था/ टाँटन

सामनावीर डेव्हिड वॉर्नरचे शानदार शतक व कर्णधार ऍरॉन फिंचचे अर्धशतक आणि कमिन्स, स्टार्क, रिचर्डसन यांच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने बुधवारच्या सामन्यात पाकिस्तानवर 41 धावांनी विजय मिळविला. चार सामन्यांत तीन विजय मिळवित ऑस्ट्रेलिया 6 गुणांसह दुसऱया स्थानावर पोहोचली आहे तर पाक आठव्या स्थानावर कायम आहे.

प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर आमिरच्या भेदक माऱयामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकांत 307 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर खराब सुरुवात होऊनही पाकने आव्हानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी न झाल्याने त्यांचा डाव 45.4 षटकांत 266 धावांत संपुष्टात आला.

आव्हानाचा पाठलाग करताना 30 व्या षटकात पाकची स्थिती 6 बाद 160 अशी नाजुक झाली होती. कर्णधार सर्फराज अहमद व वहाब रियाझ यांनी आठव्या गडय़ासाठी 64 धावांची आक्रमक भागीदारी करीत कांगारूंच्या तोंडचे पाणी पळवले होते. पण ही जोडी फुटल्यानंतर त्यांच्या आशा संपुष्टात आल्या. रियाझने 39 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 45 धावा फटकावल्या तर सर्फराजने 48 चेंडूत 40 धावा केल्या. सलामीवीर इमाम उल हकने सर्वाधिक 53 धावा केल्या तर मोहम्मद हाफीझने 46, हसन अलीने 15 चेंडूत 32, बाबर आझमने 30 धावा जमविल्या. मॅक्सवेलच्या थेट फेकीवर सर्फराजला धावचीत करून कांगारूंनी विजय साकार केला. कमिन्सने 3, स्टार्क, रिचर्डसन यांनी प्रत्येकी 2, कोल्टर नाईल व फिंच यांनी एकेक बळी मिळविला.

वॉर्नर-फिंचची शतकी सलामी

पाकचा कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. वॉर्नर व फिंच यांनी सावध सुरुवात करताना 10 षटकांत 50 धावा जमविल्या. यो दोघांनी स्थिरावल्यावर फटकेबाजी करीत पहिल्या गडय़ासाठी 146 धावांची शतकी भागीदारी केली. 34 व्या षटकापर्यंत 2 बाद 223 अशी त्यांची भक्कम स्थिती होती. त्यामुळे चारशेच्या जवळपास ते मजल मारतील, अशी अपेक्षा केली जात होती. पण आमिरच्या सनसनाटी स्पेलने सामन्याचा नूरच पालटला.

आमिरने निर्धाव षटकाने सुरुवात केली होती. पण नंतर शाहीन आफ्रिदीच्या षटकापासून कांगारूंनी आक्रमक धोरण स्वीकारले. फिंचने त्याला स्क्वेअरलेगच्या दिशेने षटकार मारल्यानंतर वॉर्नरने पुलचा चौकार मारला. कांगारू जलद धावा करण्याच्या प्रयत्नात होते. पण आमिरने आणखी एक निर्धाव षटक टाकत आपला दर्जा दाखवून दिला. एकेरी-दुहेरी धावांसह अधूनमधून चौकारही दोघांनी वसूल केले. फिंचने नंतर हाफीझच्या एका षटकात 16 धावा वसूल करताना एक षटकार, दोन चौकार मारले. 22.1 षटकांत 146 धावांची भागीदारी झाली असताना आमिरने पाकला पहिले यश मिळवून देताना फिंचला झेलबाद केले. फिंचने 84 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 82 धावा फटकावल्या.

वॉर्नरचे 15 वे शतक

नंतर वॉर्नरने हसन अलीला सलग दोन चौकार मारले तर स्टीव्ह स्मिथने दर्जेदार कव्हर ड्राईव्हचा चौकार लगावला. दोन षटकांत मोठे फटके न शांतपणे खेळून काढल्यानंतर शोएब मलिकच्या षटकात 15 धावा फटकावल्या गेल्या. वॉर्नरने त्याला एक चौकार, एक षटकार लगावला. 29 षटकाअखेर 2 बाद 189 अशी मजबूत स्थिती असताना स्मिथने (13 चेंडूत 10) वेग वाढविण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात हसन अलीकडे झेल देऊन तंबूत परतला. मॅक्सवेलने 10 चेंडूत 20 धावांची जलद खेळी केली, पण आफ्रिदीने त्याला त्रिफळाचीत केले. दरम्यान, वॉर्नरने स्लिपमधून चौकार मारून वनडेतील 15 शतक 102 चेंडूत पूर्ण केले. पण शतकानंतर तो फार वेळ टिकला नाही. 107 धावसंख्येवर असताना आफ्रिदीने त्याला झेलबाद केले. त्याने 111 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार, 1 षटकार मारला. बॉल टॅम्परिंग प्रकरणी एक वर्षाच्या बंदीनंतर पुनरागमन केल्यावर वॉर्नरचे हे पहिलेच शतक आहे. याआधी त्याने अफगाणविरुद्ध नाबाद 89 व भारताविरुद्ध 56 धावा केल्या होत्या. अन्य फलंदाजांत उस्मान ख्वाजाने 18, कॅरेने 20, शॉन मार्शने 23 धावा जमविल्या. आमिर खानने 30 धावांत 5 बळी मिळविले तर आफ्रिदीने 2, हसन अली, वहाब रियाझ, हाफीझ यांनी एकेक बळी मिळविला.

धावफलक

ऑस्ट्रेलिया : फिंच 82 (84 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), वॉर्नर 107 (111 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), स्मिथ 10 (13 चेंडूत 1 चौकार), मॅक्सवेल 20 (10 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शॉन मार्श 23 (26 चेंडूत 2 चौकार), ख्वाजा 18 (16 चेंडूत 3 चौकार), कॅरे 20 (21 चेंडूत 2 चौकार), कोल्टर नाईल 2, कमिन्स 2, स्टार्क 3, रिचर्डसन नाबाद 1, अवांतर 19, एकूण 49 षटकांत सर्व बाद 307.

गोलंदाजी : आमिर 10-2-30-5, शाहीन आफ्रिदी 10-0-70-2, हसन अली 10-0-67-1, वहाब रियाझ 8-0-44-1, हाफीझ 7-0-60-1, शोएब मलिक 4-0-26-0.

पाकिस्तान : इमाम उल हक 53 (75 चेंडूत 7 चौकार), फखर झमान 0, बाबर आझम 30 (28 चेंडूत 7 चौकार), हाफीझ 46 (49 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), सर्फराज अहमद 40 (48 चेंडूत 1 चौकार), शोएब मलिक 0, असिफ अली 5, हसन अली 32 (15 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), वहाब रियाझ 45 (39 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), आमिर 0, आफ्रिदी 1, अवांतर 14, एकूण 45.4 षटकांत सर्व बाद 266.

गोलंदाजी : कमिन्स 3-33, स्टार्क 2-43, रिचर्डसन 2-62, कोल्टर नाईल 1-53, फिंच 1-13.