|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वेण्णालेकमध्ये पर्यटक बुडाला

वेण्णालेकमध्ये पर्यटक बुडाला 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाबळेश्वर येथे दारूची पार्टी करुन वेण्णालेक येथे नौकाविहार करीत असलेल्या चार मित्रांपैकी महेश दादासाहेब रिटे (30) रा. जामखेड जि. अहमदनगर या युवकाने पोहण्यासाठी बोटीतून वेण्णा लेकमध्ये उडी मारली. उडी मारणारा युवक दारूच्या नशेत असल्याने तो धरणाच्या पाण्यात खोल बुडाला. सायंकाळपर्यंत नगरपालिका कर्मचारी, महाबळेश्वर ट्रेकर्स व पोलीस कर्मचारी शोध घेत होते, परंतू तो सापडला नाही. मुसळधार पाऊस, दाट धुके व थंडीमुळे शोधमोहिम थांबविण्यात आली. दरम्यान, त्याच्या तीन मित्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

  मंगळवारी जामखेड येथून पर्यटनासाठी बाहेर पडलेले चार मित्र महेश दादासाहेब रिटे (30), युवराज अर्जुन म्हेत्रे (32), अहमद ईलियास शेख (36), वसिम तैय्यब शेख (30) सर्व रा. जामखेड जि. अहमदनगर हे सातारा येथे आले. बुधवारी सकाळी साताऱयाहून महाबळेश्वर पर्यटनासाठी आले. दुपारी बाजारपेठ येथील वाईनशापमधून दारु घेऊन त्यांनी गाडीतच पार्टी केली. दारुच्या नशेत दुपारी बाराच्या दरम्यान त्यांनी वेण्णा लेक येथे नौकाविहारासाठी पॅडल बोट घेऊन नौकाविहारासाठी तलावात गेले. मद्यधुंद अवस्थेत असल्याने महेश रिटे याला पोहोण्याचा मोह आवरता आला नाही. हि गोष्ट त्याने आपल्या मित्रांना बोलून देखिल दाखविली. पॅडल बोटीतच त्यांची मजामस्ती सुरु होती.

  महेश याने पोहण्याच्या उद्देशाने पाण्यात थेट उडी मारली. महेश याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यातून वर आला नाही. त्याच्यासोबत असलेला मित्र अहमद शेख याने देखिल त्याचा शोध घेण्यासाठी पाण्यात उडी मारली परंतू काहीच अंदाज आला नाही. दरम्यान, या घटनेची माहिती नौकाविहार करणाऱया पर्यटकांनी वेण्णालेक वरील कर्मचाऱयांना दिली. तत्काळ कर्मचाऱयांनी स्पिडबोटीच्या साह्याने तलावात धाव घेत पाहणी केली. मात्र महेश याचा शोध न लागल्याने तत्काळ महाबळेश्वर पोलिसांसह महाबळेश्वर व सह्याद्री ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले. मात्र मुसळधार पाऊस व सोसाटय़ाचा वारा शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते.

  महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, नगरसेवक युसूफ शेख, समिर सुतार यांनी पोलीस निरिक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांच्यासह वेण्णालेक येथे घटनास्थळाची पाहणी केली. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरु होते. परंतू अंधार पडल्याने ट्रेकर्सने शोधमोहिम थांबविली. गुरूवारी सकाळी परत शोधमोहिम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ट्रेकर्सचे सुनिल भाटिया यांनी दिली.

  महाबळेश्वर येथील उन्हाळी हंगामात अंतिम टप्प्यात असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी आहे. नौकाविहार हे येथे येणाऱया अबालवृध्दांसह सर्वच पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिका सर्वच प्रकारची खबरदारी घेत असते. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाला लाईफ जॅकेट पुरवले जात असते आणी ते घालूनच नौकाविहार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही या अतिउत्साही युवकांनी सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता मौजमस्तीसाठी पाण्यात उडी मारली आणि हीच मस्ती त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा शहरात सुरु होती.