|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोयना धरणाचा पाणीसाठा ‘डेंजर झोन’मध्ये

कोयना धरणाचा पाणीसाठा ‘डेंजर झोन’मध्ये 

वीजनिर्मितीसह सिंचनाच्या पाण्याची स्थिती गंभीर

प्रतिनिधी/ नवारस्ता

जून महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी राज्यासह पावसाचे आगार समजल्या जाणाऱया कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱया कोयना धरणातील पाणीसाठा सध्या डेंजर झोनमध्ये आला आहे. काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यातील वीजनिर्मितीसह सिंचनाची  परिस्थिती चिंताजनक होण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरडय़ा पडत असलेल्या कोयना धरणातील भग्नग्नावशेष सध्या कोरडे पडू लागले आहेत.

कोयना धरणात सध्या केवळ 8 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात असणारा पाणीसाठा अत्यल्प असल्याने गत महिन्यापासून पश्चिमेकडील वीज प्रकल्पावर मर्यादा आल्या आहेत. कोयना वीज प्रकल्पातून अत्यंत कमी क्षमतेने मर्यादित वीजनिर्मिती होत आहे. पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी दोन दिवसापूर्वी केलेली उपसाबंदी पुन्हा चालू केल्याने धरणाचा पायथा वीजगृह व आपत्कालीन विमोचक्र दरवाजा चालू करण्यात आला आहे. यामुळे कोयना धरणाची स्थिती चिंताजनक बनली आहे. धरणातून चार दिवसाला 1 टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. परिणामी कोयना धरणातील पाणीसाठय़ात कमालीची घट होऊ लागली आहे. जुलै महिन्यात मात्र पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची अपेक्षा आहे अन्यथा काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यातील वीजनिर्मितीसह सिंचनाची  परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

धरणात केवळ 8 टीएमसी पाणीसाठा

       कोयना धरणात सध्या एकूण 13.21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून त्यापैकी 5.125टीएमसी हा मृत पाणीसाठा आहे त्यामुळे बुधवार अखेर धरणात केवळ 8 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामधून पूर्वेकडे सिंचनासाठी दररोज 3 हजार 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.