|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » स्थानिक टॅक्सी चालकांचा ‘फॅमिली’सह रस्त्यावर उतरण्याचा इशारा

स्थानिक टॅक्सी चालकांचा ‘फॅमिली’सह रस्त्यावर उतरण्याचा इशारा 

प्रतिनिधी/ मडगाव

स्थानिक टॅक्सी चालकांना सरकारने विश्वासात घेऊन, टॅक्सी चालकांचा प्रश्न शक्य तेव्हढय़ा लवकर निकालात काढावा, अन्यथा ‘फॅमिली’सह रस्त्यावर उतरण्याचा इशारा काल बुधवारी मडगावात झालेल्या स्थानिक टॅक्सी चालकांच्या जाहीर सभेत देण्यात आला. उद्या स्थानिक टॅक्सी चालकांची पेडणे येथे जाहीर सभा होणार असून त्यानंतर पुढील कृती निश्चित केली जाणार आहे.

गोवा माईल्स टॅक्सी ऍपला सरकारने मान्यता दिल्यापासून गोव्यात स्थानिक टॅक्सी चालक व गोवा माईल्स टॅक्सी यांच्या दरम्यान संघर्ष निर्माण झालेला आहे. स्थानिक टॅक्सी चालकावर अन्याय करून सरकार गोवा माईल्स टॅक्सीचे समर्थन करीत असल्याने, काल मडगावात झालेल्या जाहीर सभेत सरकारचा निषेध करण्यात आला. ‘गोवा माईल्स टॅक्सी अप’ ही स्थानिक नाही. तिला सरकारची कोणतीच मान्यता नाही. सद्या गोवा माईल्स टॅक्सी बेकायदेशीर व्यवसाय करीत असल्याचा आरोप या सभेतून करण्यात आला.

या जाहीर सभेला मडगावचे आमदार दिगंबर कामत, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, अखिल गोवा टॅक्सी चालक संघटणेचे अध्यक्ष चेतन कामत, काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी चालक संघटणेचे अध्यक्ष सुनील नाईक, मडगावचे नगरसेवक अविनाश शिरोडकर तसेच विविध टॅक्सी चालक संघटणेचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोवा माईल्स टॅक्सीच्या एका पदाधिकाऱयाने हल्लीच पत्रकार परिषदेत घेऊन, गोवा माईल्स टॅक्सी सरकारच्या तिजोरीत भर घालीत असल्याचा दावा केला होता. त्याच बरोबर स्थानिक टॅक्सी चालकांकडून सरकारला काहीच लाभ होत नसल्याचे म्हटले होते. पण, हा मुद्दा या सभेत खोडून काढण्यात आला. विविध कराच्या रूपाने स्थानिक टॅक्सी चालक, गोवा माईल्स टॅक्सीच्या तुलनेत अधिक भर सरकारी तिजोरीत घालत असल्याची माहिती यावेळी श्री. फडते यांनी दिली.

गोव्यात स्थानिक टॅक्सी व्यवसाय हे पोर्तुगीज काळापासून करीत आले आहे. त्यांना कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज नाही. आजवर पर्यटकांना तसेच स्थानिक लोकांना सर्वोत्तम सेवा दिली आहे. आज सरकारने गोवा माईल्स आणून स्थानिक टॅक्सी वाल्यावर अन्याय केला आहे. हा अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशारा श्री. फडते यांनी दिला.

टॅक्सीच्या व्यवसायातून संसार उभे केले

पोर्तुगीज काळापासून गोव्यात टॅक्सी व्यवसाय प्रामाणिकपणे चालत असून अनेकांनी या व्यवसायातून संसार उभे केल्याचे उद्गार माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काढले. या व्यवसायात स्थानिक लोक असून सरकारवर कोणताच ताण न आणता स्वताच्या पायावर उभे राहतात, त्यांना सरकारने त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर स्थानिक टॅक्सी चालकांना कांऊटर देण्यास रेल्वेचे अधिकारी तयार नव्हते. मात्र, त्यासाठी संघर्ष करावा लागला व सुरवातीला दोन लाख रूपयांचे भाडे भरून कांऊटर घेण्यात आला. आज स्थानिक टॅक्सी चालक या कांऊटरचे आठ लाख रूपये भाडे कोकण रेल्वेला देत असल्याची माहिती श्री. कामत यांनी दिली.

सरकारने स्थानिक टॅक्सी चालकांचा प्रश्न लवकर निकालात काढण्याची गरज आहे. आपला सदैव स्थानिक टॅक्सी चालकांना पाठिंबा असेल असे आश्वासन श्री. कामत यांनी यावेळी दिले.

मायकल लोबोचे आश्वासन कुठे गेले

मायकल लोबो यांनी पणजीत स्थानिक टॅक्सी चालकांनी आंदोलन छेडले होते. त्यावेळी भेट देऊन आपण या प्रश्नावर सरकार दरबारी तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन कुठे गेले असा सवाल प्रतिमा कुतिन्हो यांनी उपस्थित केला.

गोंय, गोंयकार, गोंयकारपणाची भाषा बोलणारे स्थानिक टॅक्सी चालकांना का पाठिंबा देत नाही. कुठे गेले त्याचे गोंयकारपण असा सवाल यावेळी उपस्थित केला. गोवा माईल्स टॅक्सी चालकांमध्ये किती जण स्थानिक आहेत. त्याचा ऍप कोण चालवतो, यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या.

निखील देसाईची उचलबांगडी करा

वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई यांची उचलबांगडी केल्यास टॅक्सी चालकांचा प्रश्न लवकर सुटू शकतो. सद्या निखील देसाई हेच टॅक्सी चालकांना छळत असल्याचा आरोप अखिल गोवा टॅक्सी चालक संघटणेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी केला. त्याच बरोबर गोवा माईल्स टॅक्सी ऍप ही गोव्याला लागलेली किड असून ती दूर करावीच लागेल. गोवा माईल्स टॅक्सीला कोणताच परवाना दिलेला नाही. त्यामुळे त्याचा व्यवसाय हा बेकायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञान हवेच त्याला आमचा विरोध नाही. परंतु स्थानिकांना डावलून इतरांना संधी देणे खपवून घेतले जाणार नाही. सर्वांनी एकजूट ठेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अविनाश शिरोडकर, सोहन सावर्डेकर, शेखर उसकईकर इत्यादीनी मार्गदर्शन केले.