|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कवळे भागात झाडांची पडझड

कवळे भागात झाडांची पडझड 

वार्ताहर/ मडकई

कवळे पंचायत क्षेत्रातील वरचावाडा गाळशिरे येथे रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली. तर लोकमान्य टिळक विद्यालयाजवळ अशोक आमोणकर यांच्या घरावर वृक्ष कोसळून हानी झाली. बुधवारी दुपारी 12 वा. सुमारास जोरदार पावसाच्यावेळी या घटना घडल्या.

गाळशिरे येथे रस्त्याच्या बाजुला असलेले आंब्याचे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली. तीन वीज खांबही मोडून पडले. त्यामुळे या मुख्य मार्गावरील वाहतूक साधारण तीन तास खोळंबली. सरपंच राजेश कवळेकर व पंचसदस्य उषा नाईक यांनी अग्नीशामक दलाला पाचारण केले. अग्नीशामक दलाच्या पथकाने झाड हटवून रस्ता मोकळा केला. लोकमान्य टिळक विद्यालय व सरस्वती विद्यालयात शिकणाऱया विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याच्या वेळीच ही घटना घडल्यामुळे विद्यार्थीही वाहतुकीत अडकून पडले.

धोकादायक झाडे कापण्याकडे दुर्लक्ष

या भागातील धोकादायक झाडे पावसाळय़ापूर्वी कापून टाकण्याचे निवेदन शांतादुर्गा देवस्थान व कपिलेश्वरी देवस्थानला कवळे ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली होती. या निवेदनातून देवस्थान समिती व मुंडकारांना विनंती करण्यात आली होती. पंचायत राज कायदा कलम 76 चा वापर करून ही झाडे कापून टाकण्यात यावीत असे पंचायतीतर्फे देवस्थानला समितीला कळविण्यात आले होते. पंचायतीच्या निवेदनावर उत्तर देवस्थान समितीने 2008 राखीव झाडांच्या कलमानुसार ही झाडे कापण्यास मनाई असून त्याचे संवर्धन करावे असे प्रत्युत्तर दिले होते. मात्र ही झाडे संवर्धन करण्याच्या स्थितीत नसून ती अत्यंत जुनाट झालेली आहेत. या झाडापासून घरांना व लोकांच्या जीविताला धोका आहे. गावातील नागरिकही आता देवस्थान समितीच्या अशा निर्णयाला कंटाळले आहेत, असे राजेश कवळेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.