|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

फोंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी 

तालुक्याच्या विविध भागांमध्ये पडझड

प्रतिनिधी/ फोंडा

मोन्सूनपूर्व पावसाने फोंडा तालुक्यात जोर धरला असून गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. बुधवारी सकाळी जोरदार पावसाबरोबरच आलेल्या वाऱयाच्या तडाख्यात तालुक्यातील विविध भागांमध्ये झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी घरांवर व रस्त्यांवर झाडे कोसळली. फर्मागुडी येथील जीव्हीएम महाविद्यालयासमोर फोंडा-पणजी महामार्गावर झाड उन्मळून पडल्याने दोन वाहनांची नुकसानी झाली.

 बुधवारी दिवसभर फोंडा व कुंडई अग्नीशामक केंद्रामध्ये पडझडीच्या साधारण नऊ ते दहा घटनांची नोंद झाली होती. फर्मागुडी येथील जीव्हीएम महाविद्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेला धोकादायक वृक्ष रस्त्यावर कोसळल्याने एक कार गाडी, एक ट्रक व अन्य एका वाहनाची हानी झाली. केरी फोंडा येथील सातेरी मंदिराजवळ प्रसन्ना नाईक यांच्या घरावर झाड कोसळून साधारण 10 हजार रुपयांची नुकसानी झाली. उंडीर बांदोडा येथील राममंदिरजवळ एका घरावर कलंडलेला धोकादायक वृक्ष अग्नीशामक दलाने हटविला. डोंगरवाडा मापा पंचवाडी व इगर्जवाडा पंचवाडी येथे दोन घरांवर वृक्ष कोसळले. सायंकाळी उशिरापर्यंत फोंडा अग्नीशामक पथकाकडून याठिकाणी मदतकार्य सुरु होते. गाळशिरे कवळे येथे रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली.

करंजाळ मडकई येथील मारुती मंदिरच्या घुमटीवर झाड कोसळल्याने साधारण रु. 15 हजारांची तर लाडेवाडा मडकई येथील गोविंद दत्ता नाईक यांच्या घरावर झाडाची फांदी कोसळून साधारण रु. 5 हजारांची नुकसानी झाली. लाडेवाडा मडकई रस्त्यावर वृक्ष कोसळल्याने वाहतुकीत व्यत्यय आला. काही भागांमध्ये या पडझडीमुळे वीज पुरवठय़ावरही परिणाम झाला. फोंडा व कुंडई अग्नीशामक दलाच्या पथकाने दिवसभर धावपळ करून मदतकार्य केले.