|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुडचडे परिसरात पडझडीच्या घटना

कुडचडे परिसरात पडझडीच्या घटना 

प्रतिनिधी/ कुडचडे

कुडचडे व नजीकच्या अन्य परिसरांना बुधवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाबरोबर सोसाटय़ाच्या वाऱयाने झोडपून काढले. बऱयाच ठिकाणी याचा परिणाम दिसून आला आहे. राज्यात विविध ठिकाणी पावसाचे आगमन झाले, तरी कुडचडे परिसरातील जनता पावसाची आतूरतेने वाट पाहत होती. त्याची भरपाई बुधवारी पावसाने केली.

मात्र बऱयाच ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून झाडे मोडून पडली आहेत. तसेच कित्येक ठिकाणी छप्परच उडून गेले आहे. काही ठिकाणी आस्थापनाच्या छपरावरील पत्रे उलटे झाले आहेत. बऱयाच ठिकाणी झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. कुडचडे येथील मिनी क्रीडा संकुलावरील सिमेंटचे पत्रे वाऱयाने तुटून गेले असून सदर सिमेंटच्या पत्र्यांचे तुकडे छपरावर इतर ठिकाणी पडल्यामुळे अन्य पत्रे तुटले आहेत व पावसाचे पाणी आतमध्ये पडत आहे. सदर संकुलात बॅडमिंटन खेळण्यासाठी कोर्ट असून सध्या ते आवरण टाकून झाकून ठेवण्याची पाळी आली आहे.