|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उसगावात राहायचे असेल तर शांततेत राहा..!

उसगावात राहायचे असेल तर शांततेत राहा..! 

वार्ताहर/ उसगांव

उसगाव पंचायत क्षेत्रात वास्तव्य करुन असलेल्या बिगर गोमंतकीय लोकांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे उसगाव गावाचे नाव बदनाम होत आहे. यापुढे अशा घटना घडल्यास ग्रामस्थांना त्यांच्याविरोधात कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करावे लागेल. आम्हाला गावात शांतता हवी आहे, असा इशारा स्वाभीमानी उसगावकरांतर्फे देण्यात आला आहे.

ताकवाडा उसगांव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. चोऱया, मारामारी अशा विविध गुन्हेगारी स्वरुपाच्या प्रकरणात गुंतलेले आपला पत्ता उसगांव असा देत आहेत. प्रत्यक्षात ते उसगाववासीय असून या गावाशीही तसा त्यांचा संबंध नाही. हे सर्व बिगरगोमंतकीय आहेत. तिस्क उसगांव, म्हारवासडा व उसगांव पंचायत क्षेत्रात राहणाऱया गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अशा बिगर गोमंतकीयांकडून उसगांव भागाची बदनामी होत असल्याचा आरोप स्वाभीमानी उसगांववासियांनी केला आहे. मोले येथे अबकारी खात्याच्या गोदामातून दारूचा साठा चोरी प्रकरणा अटक झालेले सर्व संशयित बिगरगोमंतकीय आहेत. पण त्यातील बहुतेकजणांनी आपला पत्ता उसगांव असा दिला आहे. काहींनी तर आपली नावे व आडनावे बदलून गोमंतकीय असल्याचे भासविले आहे. त्यामुळे उसगावची व गोव्याचीही बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला.

खास ग्रामसभेसाठी पंचायतीला देणार निवेदन

मोले येथील दारु साठा चोरी प्रकरण, तिस्क येथील बस टायर चोरी, एटीएम फोडण्याचा प्रकार, वाहनांच्या बॅटरी चोरी प्रकरण व इतर गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेले आरोपी व आडनावे बदलून गोमंतकीय असल्याचे भासविणारे हे सर्व बिगर गोमंतकीय आहेत. सध्या ते उसगांव भागात स्थायिक झाले आहेत. हे प्रकरण गंभीर असून या विषयावर चर्चा करण्यासाठी उसगांव पंचायतीला सहय़ानिशी लेखी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उसगांव पंचायत क्षेत्रात भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया बिगर गोमंतकीयांची ओळखपत्रे फोटोसह पंचायतीकडे जमा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पोलिसांनीही याकडे लक्ष घालण्याची गरज व्यक्त करण्यात आली. 

कोमुनिदाद व पंचायतीने खबरदारी घ्यावी

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक बिगरगोमंतकीय आज उसगांव पंचायत क्षेत्रात घरे बांधून किंवा भाडय़ाच्या खोल्यामध्ये राहत आहेत. कुठल्याही प्रकारचा ना हरकत दाखला किंवा इतर प्रकारच्या सुविधा पुरविताना पंचायत व कोमुनिदादने खबरदारी घेतली पाहिजे. संपूर्ण चौकशी करूनच योग्य निर्णय घ्यावा असे स्वाभिमानी उसगावकरांचे म्हणणे आहे.

आडनावे बदलण्याचे प्रकार गंभीर

बिगरगोमंतकीय असलेले अनेकजण आपले नाव व आडनाव बदलून गोमंतकीय असल्याचे भासवीत आहेत. आडनावे बदलण्याचे हे प्रकार गंभीर असून किती लोक अशी आडनावे बदलून राहतात यांची चौकशी झाली पाहिजे.

गुन्हेगारी सोडा शांततेत राहा

नोकरी व्यावसायानिमित्त अनेक बिगरगोमंतकीय लोक उसगांव भागात स्थायिक झाले आहेत. पण यापैकी काही लोक सरळमार्गी न राहता चोऱया, मारामाऱया अशा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत आहेत. ज्यामुळे उसगांवचे नाव नाहक बदनाम होत आहे. अशा लोकांनी गुन्हेगारी सोडावी व गावात शांततेत राहावे, असे आवाहन स्वाभीमानी उसगांववासियांतर्फे करण्यात आले आहे.