|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘वायू’मुळे राज्यात पावसाची दमदार हजेरी

‘वायू’मुळे राज्यात पावसाची दमदार हजेरी 

चक्रीवादळाने दिशा बदलल्याने नुकसान टळले

विशेष प्रतिनिधी/ पणजी

‘वायू’ चक्रीवादळापासून गोवा थोडक्यात बचावला. दि. 11 जून रोजी सायं. 5.30 वा.च्या दरम्यान वायू वादळ गोव्यापासून केवळ 250 ते 300 कि.मी. अंतरावर होते व सायं. 7 वा. वादळाने दिशा बदलली. अन्यथा गोव्याचे प्रचंड नुकसान झाले असते. दरम्यान, बुधवारी राज्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. तापमान खाली उतरले. राज्यातील जनतेला उकाडय़ापासून दिलासा मिळाला. तथापि, वायूमुळे गोव्यात येणारा मान्सून अद्याप केरळमध्येच स्थिर राहिला आहे. गोव्यात परतण्यास आणखी दोन दिवसांचा विलंब लागणार आहे.

वायू चक्रीवादळ गोव्याच्या बाजूने येऊन दिशा बदलून गुजरातला रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी देखील गोवा ‘वायू’ वादळापासून दूर राहणार की नाही याबाबत साशंकता होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा वेधशाळेचे संचालक डॉ. के. व्ही. पाडगलवार यांच्याशी चर्चा केली व सायं. 7 वा.नंतर पाडगलवार यांनी वादळ गोव्यापासून पुढे सरकल्याचे जाहीर केले.

2009 मध्ये गोव्याच्या दिशेने येणारी सुमारे 5 चक्रीवादळे पुढे सरकली होती. त्यातील दोन चक्रीवादळे समुद्रातच झाली होती. त्यात गोव्यातील ट्रॉलर्सवर काम करणारे सुमारे 22 खलाशी गायब झाले होते. 1994 मध्ये अरबी समुद्रापासून गोव्यात धडक देणारे सर्वात मोठे वादळ होते जे सुमारे 5 तास चालले आणि त्यात गोव्याची अपरिमीत हानी झाली होती. तसेच सुमारे 13 माणसे दगावली होती. वायू वादळ गोव्यापासून 250 किमी पर्यंत येऊन ते पुढे गुजरातच्या दिशेने सरकले, त्यामुळे गोवा बचावला.

गोव्यावर परिणाम

अपरिमीत हानी मात्र टळली

या वादळाचा गोव्यावर परिणाम झाला. गोव्यात दोन दिवस दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर राज्यात सर्वत्र जोरदार वादळी वारे आल्याने अनेक झाडांची पडझड झाली. त्यात गाडय़ांचे तसेच घरांचेही नुकसान झाले. तथापि, वायू वादळाचा थेट परिणाम गोव्यावर झाला असता तर गोव्याची प्रचंड हानी झाली असती. गोमंतकीय या नैसर्गिक संकटापासून थोडक्यात बचावले.

राज्यात सर्वत्र दमदार पाऊस

गोवा वेधशाळेचे संचालक डॉ. के. व्ही. पाडगलवार यांच्याशी संपर्क साधला असता गोव्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याचे ते म्हणाले. आगामी तीन दिवस राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडणार आहे. राज्यात सर्वाधिक 56 मिमी म्हणजे दोन इंच पाऊस फोंडय़ात झाला. मडगावातही दोन इंच पडला तर पणजीत सव्वा इंच पावसाची नोंद झाली. आगामी 24 तासात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मान्सून पुन्हा लांबणीवर!

वायू वादळामुळे केरळमधून गोव्याच्या दिशेने पुढे सरकारणाऱया मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सूनचा वेग मंदावल्याने तो आता केरळमध्येच स्थिर राहिला. मान्सूनला आवश्यक असलेले सारे पोषक वातावरणच एकत्रितपणे वायू वादळ आपल्यासोबत घेऊन गेल्याने मान्सूनवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे डॉ. पाडगलवार म्हणाले.

दरम्यान, बंगालच्या खाडीतही आणखी एक वादळ तयार होण्याच्या मार्गावर आहे व तसे झाल्यास हे वादळ पुढे सरकेल त्यावेळी मान्सूनला अरबी समुद्रातील वातावरणाने गती मिळेल व मान्सून गोव्याच्या दिशेने आगेकूच करील. 13 ते 14 जूनच्या ऐवजी आता मान्सून गोव्यात जून 15 वा त्यानंतर प्रवेश करील असे डॉ. पाडगलवार यांनी सांगितले.

गेल्या 24 तासात पडलेला पाऊस

राज्यात गेल्या 24 तासात सर्वत्र दमदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे तापमान खाली उतरले. कमाल तापमान 32.2 डि.से. तर किमान तापमान 24 डि.से. राहिले. पणजीत अद्याप 8 इंच पाऊस कमी झालेला आहे.