|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजप प्रवेशासाठी आमदारांना एकही पैसा दिला नाही

भाजप प्रवेशासाठी आमदारांना एकही पैसा दिला नाही 

भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/ पणजी

आमदार फोडण्यासाठी कोटय़वधींचे पॅकेज दिल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी फेटाळून लावला असून भाजप प्रवेशासाठी आमदारांना एकही पैसा दिला नसल्याचा दावा केला आहे. या आरोपावरुन तेंडुलकर यांनी चोडणकरांचा निषेध नोंदवला असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे म्हटले आहे.

पणजीत काल बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेंडुलकर यांनी काँग्रेसचे आरोप खोडून काढताना सांगितले की, भाजप – मित्रपक्ष मिळून सध्या 23 चे संख्याबळ आपल्या सरकारकडे असून ते स्थिर आहे. त्यामुळे आणखी आमदारांची गरज नाही.

चोडणकरांनी त्यांचे आमदार सांभाळावेत

जर काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करतो म्हणून सांगत असतील तर त्यांना आपण अडवू शकत नाही. चोडणकरांनी त्यांचे आमदार सांभाळावेत, उगाच खोटे आरोप भाजपवर करु नयेत. पॅकेज दिले म्हणून जर त्यांच्याकडे संभाषण असेल तर ते जाहीर करावे म्हणजे खरे – खोटे काय ते कळेल, असेही आव्हान तेंडुलकर यांनी दिले.

देशभरात काँग्रेसचे अनेकजण भाजपात

देशभरात काँग्रेसचे आमदार, कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपकडे येत आहेत. आगामी 25 वर्षे काँग्रेसची सत्ता येणे कठीण असल्यामुळे हे घडत आहे, असे मत तेंडुलकर यांनी मांडले.

संघटनात्मक निवडणुका लवकरच

भाजपच्या गोव्यातील संघटनात्मक निवडणुका लवकरच होणार असून त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या दिल्लीतील बैठकीत तेंडुलकर व संघटनमंत्री सतीश धोंड जाणार आहे. बूथ, मतदारसंघ समित्या, दोन्ही जिल्हा समित्या, प्रदेश समिती व अध्यक्ष अशा सर्वांची निवडणूक लवकरच होणार असल्याची माहिती तेंडुलकर यांनी दिली.

सर्वसाधारण गटातील आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची कार्यवाही आता गोवा सरकार करणार आहे, अशी माहिती माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी दिली आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री डॉ. सावंत तसेच सरकारचे अभिनंदन केले.

काँग्रेसच्या 10 आमदारांच्या प्रवेशाचा प्रस्ताव शहांनी फेटाळला

गोव्यातील काँग्रेसचे एकूण 10 आमदार भाजपात प्रवेश करण्यासाठी तयार होते व तसा प्रस्तावही आला होता, परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तो प्रस्ताव नाकारल्यामुळे ते घडू शकले नाही, असा गौप्यस्फोट विनय तेंडुलकर यांनी यावेळी केला.