|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बसच्या खिडकीतून हात बाहेर काढलेल्या बालिकेचा हात निकामी

बसच्या खिडकीतून हात बाहेर काढलेल्या बालिकेचा हात निकामी 

प्रतिनिधी / बेळगाव

बसमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत प्रवास करताना खिडकीतून हात बाहेर काढलेल्या एका बालिकेचा हात निकामा झाला आहे. बसला भरधाव ट्रक घासून गेल्याने बुधवारी सायंकाळी देसूरजवळ ही घटना घडली आहे.

आतिया मेहबूब शेख (वय 6 रा. पिरनवाडी) असे त्या बालिकेचे नाव आहे. सायंकाळी 108 रुग्णवाहिकेतून तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणण्यात आले होते. तिची अवस्था पाहून कुटुंबीयांनी तातडीने तिला खासगी इस्पितळात हलविले. तिचा उजवा हात निकामा झाला आहे.

केए 22 एफ 1912 क्रमांकाच्या परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना ही घटना घडली आहे. नंदिहळ्ळीहून बेळगावला येणाऱया या बसमध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत आतिया प्रवास करीत होती. देसूरहून पिरनवाडीला येताना ही घटना घडली आहे.

आतिया खिडकीजवळ बसली होती. तिने आपला उजवा हात खिडकीबाहेर काढला हाता. त्यावेळी याच मार्गावरून जाणाऱया भरधाव ट्रकने बसला घासून गेल्याने तिचा हात तुटून पडला. त्यानंतर बस थांबविण्यात आली. तुटून पडलेला हात कॅरिबॅगमध्ये घालून तो इस्पितळात आणण्यात आला.

त्या बालिकेची अवस्था पाहून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनाही धक्का बसला. कुटुंबीय तर पार घाबरून गेले होते. तुटून पडलेला हात परत जोडता येतो, असा सल्ला दिल्यामुळे या बालिकेला तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले असून सायंकाळी परिवहन मंडळाची ती बस बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणण्यात आली आहे.