|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विहीर स्वच्छ करताना गुदमरून तरुणाचा मृत्यू

विहीर स्वच्छ करताना गुदमरून तरुणाचा मृत्यू 

शहापूर येथील घटना : तिघा जणांविरुद्ध एफआयआर

प्रतिनिधी/ बेळगाव

विहिरीतील गाळ काढताना गुदमरून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी गाडेमार्ग शहापूर येथे ही घटना घडली असून आणखी एक तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अविनाश सुभाष पुजारी (वय 24 रा. बन्नूर तांडा, ता. रामदुर्ग) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आणखी एक कामगार वालेश गणपती पुजारी (वय 34) हा जखमी झाला आहे. बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून विहीर मालकासह तिघा जणांविरुद्ध भादंवि 304 (ए), 337, सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडेमार्ग शहापूर येथील प्रल्हाद सदाशिव तारिहाळकर यांच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू होते. अविनाशला हे काम जमत नव्हते. तरीही वालेश पुजारी व रवि शिवाजी पुजारी या दोघा जणांनी त्याला विहिरीत उतरविले.

सुमारे 38 फूट विहिरीत उतरून गाळ काढताना गुदमरून अविनाश अत्यवस्थ झाला. त्यानंतर तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related posts: