|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नावासाठी निवेदन द्यायला आलात काय?

नावासाठी निवेदन द्यायला आलात काय? 

वार्ताहर/ निपाणी

इयत्ता तिसरीच्या माय मराठी या पुस्तकात अक्षम्य अशा चुका झाल्या आहेत. यासाठी ती वितरीत केलेली पाठय़पुस्तके परत घ्या व नव्याने सुधारीत छपाई करून विद्यार्थ्यांना वितरीत करा, या चुकीला जबाबदार असणाऱयांवर कठोर कारवाई करा, या आशयाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या निपाणी तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांना तुम्ही नावासाठी निवेदन द्यायला आलात काय?, असा अनाहूत सवाल बीईओ कार्यालयाचे व्यवस्थापक राजशेखर देसाई यांनी केला. यावेळी पत्रकारांनी याचा जाब विचारताच देसाई हे निरुत्तर झाले. या प्रकाराबाबत सर्वच पत्रकारांनी निषेध व्यक्त केला.

पुस्तकातील चुका सुधारण्याची विनंती करण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या वेळी निपाणी तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांना कार्यालयात गटशिक्षणाधिकारी के. रामनगौडा हजर नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर कार्यालयाचे व्यवस्थापक असणारे राजशेखर देसाई निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयाबाहेर आले. मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य, मराठी पुस्तकातील चुका दाखविण्यासाठी मराठीतून निवेदन देणे साहजिक आहे. असे असताना निवेदन स्वीकारताना देसाई यांनी सदरचे निवेदन कन्नडमध्ये द्या, असे सांगितले. यामुळे पत्रकारांनी या वक्तव्याचा निषेध करत मराठी पुस्तकातील चुका सुधारण्यासाठी मराठीतूनच निवेदन देणार. जर समजत नसेल तर भाषांतर करून घ्या, असे सांगितले.

पत्रकारांकडून निषेध

हा प्रकार सुरू असतानाच देसाई यांनी पाठय़पुस्तकात झालेल्या चुका आम्हाला माहित आहेत. तुम्ही याविषयी निवेदन देऊन नाव करण्यासाठी आलात काय?, असा अनाहूत सवाल केला. या सवालामुळे संतप्त पत्रकारांनी देसाई यांना धारेवर धरले. आम्ही पत्रकार तुमचे नाव करतो. आम्ही आमच्या नावाचा कधीच विचार करत नाही. पुस्तकातील चुका शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणाऱया आहेत. यातून ज्येष्ठ नेते, कवी, लेखक यांचा अवमान झाला आहे. याकडे लक्ष देऊन सुधारणा करण्यापेक्षा नावाचा विषय काढताच कसा?, असे विचारताच देसाई निरुत्तर झाले. या प्रकाराबाबत सर्वच पत्रकारांनी निषेध व्यक्त केला.