|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए

दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए 

गिरीश कार्नाड यांचे निधन झाले त्याच दिवशी बेंगळूर येथे एक मोठा घोटाळा उघडकीस आला. आयएमए ज्वेलर्सचा संस्थापक महमद मन्सूर खान या ठकसेनाने गुंतवणूकदारांना शेकडो कोटीचा गंडा घालून पलायन केले आहे. अत्यंत शिस्तबद्धपणे त्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ठकवल्याचे उघडकीस आले आहे.

 

काँग्रेस-निजदमधील असंतोष दूर करण्यासाठी शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. दोन अपक्ष आमदार व एका निजद आमदाराला मंत्रिपद मिळणार आहे. या विस्ताराने काँग्रेसमधील असंतोष पुन्हा उफाळणार आहे. एकीकडे कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेचे सावट कायम असतानाच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्ये÷ साहित्यिक, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कार्नाड यांचे या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी 10 जून रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी किंवा राजकीय इतमामाशिवाय त्यांच्यावर अंत्यक्रिया करण्यात आली. साहित्य, नाटय़, चित्रपट क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपले आहे. आयुष्यभर त्यांनी साधेपणा जोपासला. निधनानंतरही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सरकारी सन्मान नाकारला.

डॉ. गिरीश कार्नाड यांचे निधन झाले. त्याच दिवशी राजधानी बेंगळूर येथे एक मोठा घोटाळा उघडकीस आला. आयएमए ज्वेलर्स (आय मॉनिटरी ऍडव्हायझरी ज्वेलर्स) चा संस्थापक महमद मन्सूर खान या ठकसेनाने गुंतवणूकदारांना शेकडो कोटीचा गंडा घालून पलायन केले आहे. अत्यंत शिस्तबद्धपणे त्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ठकवल्याचे उघडकीस आले आहे. या फसवणूक प्रकरणातून कर्नाटकात कलगीतुरा रंगला आहे. 10 जून रोजी मन्सूरखानच्या शिवाजीनगर येथील लेडी कर्झन रोडवरील आयएमए ज्वेलर्सला टाळे ठोकल्याचे उघडकीस आले. त्याआधी एक दिवस त्याची एक ध्वनिफित व्हायरल झाली होती. बेंगळूर पोलीस आयुक्तांना उद्देशून स्वतः मन्सूरखानने ही ध्वनिफित बनविली होती. शिवाजीनगरचे आमदार आर. रोशन बेग यांना आपण 400 कोटी दिले असल्याचा उल्लेख त्यात केला होता. आपण आत्महत्या करीत आहोत. आपली मालमत्ता मोठी आहे. त्याची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करा, असा मानभावी सल्लाही या ठकसेनाने पोलीस अधिकाऱयांना या ध्वनिफितीत दिला होता. रोशन बेग यांच्यापाठोपाठ अल्पसंख्याक कल्याण मंत्री जमीर अहमद यांचे नावही चर्चेत आहे. आयएमएकडून जमीर अहमद यांनी पाच कोटी घेतल्याचे उघड झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रमाणपत्रातही त्याचा उल्लेख केला आहे. एका मालमत्तेच्या व्यवहारातून आपण ही रक्कम घेतल्याचे जमीर अहमद यांनी कबूल केले आहे.

माजी मंत्री रोशन बेग असोत किंवा विद्यमान मंत्री जमीर अहमद असो हे मन्सूर खानचे जवळचेच. स्वतः मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंत्री जमीर अहमद यांनी आपल्या हाताने मन्सूर खानला बिर्याणी भरवतानाचे फोटोही गुंतवणूकदारांनी डोळे भरून पाहिले आहेत. राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी डीआयजी रविकांते गौडा यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीच्या अधिकाऱयांनी आयएमएच्या सात संचालकांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याची मागणी रोशन बेग यांनी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध आपण टीका केली होती. त्यामुळेच आपल्यावर सूड उगवण्यासाठी या प्रकरणात आपले नाव गोवण्यात आल्याचे म्हणणे रोशन बेग यांनी मांडले आहे.

बुधवारी रात्रीपर्यंत 20 हजारहून अधिक गुंतवणूकदारांनी फिर्याद दिली आहे. फिर्याद देण्यासाठीच मोठी गर्दी होत आहे. हे लक्षात घेऊन शिवाजीनगर येथील एनएस कन्व्हेन्शन हॉलमध्ये 50 हून अधिक पोलीस ठाण मांडून आहेत. केवळ बेंगळूर शहरच नव्हे तर राज्यातील वेगवेगळय़ा जिल्हय़ातून येणाऱया गुंतवणूकदारांकडून तक्रारी स्वीकारण्याचे काम या हॉलमध्ये सुरू आहे. 13 वर्षांपूर्वी मन्सूर खानने आयएमएची स्थापना केली. त्याच्याकडे दागिने खरेदी करण्यासाठी जाणाऱयांना घडणावळ आणि वेस्टेज आकारण्यात येत नव्हते. त्यामुळे त्याच्या पेढीवर गर्दी असायची. एकदा दागिने खरेदीसाठी ग्राहक तेथे पोहोचले तर आकर्षक व्याजदर देण्याचे सांगून पैसे गुंतवण्यासाठी तेथील कर्मचारी ग्राहकाला उद्युक्त करत. एक लाख गुंतवले तर दरमहा तीन हजार रु. गुंतवणूकदाराला दिले जात होते. त्यामुळे एक लाखापासून दोन कोटीपर्यंत या सं गुंतवणूक करणाऱयांची संख्या मोठी आहे. हा आकडा एक हजार कोटी ओलांडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मन्सूर खान दुबईला पळाला आहे. ही ध्वनिफित तुमच्या हाती लागेपर्यंत आपण आत्महत्या केलेली असणार, असा पहिल्या ध्वनिफितीत त्याने उल्लेख केला होता. मन्सूर खान अद्याप जिवंत आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह दुबईला पळाला आहे. मंत्री जमीर अहमद यांनी विधानसौधमध्ये बसून पत्रकारांसमोर हात जोडून त्याला विनंती केली आहे. ‘झाले गेले विसरा, तुम्ही बेंगळूरला परत या. आम्ही तुमच्या मागे आहोत. गरीबांनी आयएमएमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यांचे पैसे परत करा’ अशी त्यांनी विनंती केली आहे. दोन वर्षापूर्वी याच बेंगळूर शहरात ऍम्बिडंट या कंपनीने 3 हजार कोटीना गंडा घातला होता. विनिविंक, अजमेरा आदी संस्थांनीही हजारो कोटीना गुंतवणूकदारांना ठकविले आहे. तरीही लोक अशा बेभरवशाच्या संस्थेत गुंतवणूक करतात. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. मन्सूर खानच्याबाबतीत तर हे म्हणणे खरे ठरले आहे. एक वर्षपूर्वी बेंगळूर उत्तरचे प्रांताधिकारी एन. सी. नागराज यांनी कन्नड, इंग्लीश व उर्दू दैनिकात जाहिराती देऊन आयएमए ही संस्थाच धोकेबाज आहे. गुंतवणूकदारांनी या संस्थेविरुद्ध तक्रारी कराव्यात, असे आवाहन या अधिकाऱयाने केले होते. त्यावेळी अनेक गुंतवणूकदार त्याच्या कार्यालयात पोहोचले होते. आयएमएबरोबर आमचा व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे. तुम्ही या संस्थेवर कारवाई करण्यासाठी का घाई करता असे धारेवर धरले होते. नागरिकांना सतर्क करणाऱया या अधिकाऱयाविरुद्ध स्वतः मन्सूर खानने उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. कर्नाटकातील आजवरचा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. हजारो गुंतवणूकदार कंगाल झाले आहेत.

रमेश हिरेमठ