|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तैसा जाण राजा भीमक

तैसा जाण राजा भीमक 

आपल्या रुपसंपन्न, सद्गुणसंपन्न कन्येचे आणि लाडक्मया पराक्रमी जावयाचे कौतुक कोणाला असत नाही? म्हणूनच तर इतक्मया मराठी कवींना, साहित्यिकांना या रुक्मिणीस्वयंवर कथेने भुरळ घातली आहे काय? एकनाथ महाराज पुढे वर्णन करतात- जैसा मूर्तिमंत विवेक ।  तैसा जाण राजा भीमक । सत्त्वाथिला अतिसात्त्विक । निष्कलंक शोभत । विदर्भ देशाचा राजा भीष्मक होता. तो अतिशय सात्विक होता. भीष्मक म्हणजे मूर्तिमंत विवेक. त्याचे चारित्र्य निष्कलंक होते. कवी नरेंद्राने भीष्मकाचे वर्णन केले आहे, त्याचा भावार्थ असा-भीष्मक म्हणजे सोमवंशाचे भूषण होते. त्याची कीर्ती त्रिभुवनात पसरली होती. तो कुंडिनपुरात जरी राज्य करीत होता, तरी त्याची कीर्ती दशदिशांना पसरली होती. कौतुकवती वार्ता, विमल विद्या व निष्कलंक कीर्ती तेलाचा बिंदु पाण्यावर पसरावा तशी पसरते. त्याच्या एकेका गुणाची सर कोणाला येत नव्हती. धरणीचे धैर्य व समुद्राचा अगाधपणा याचे वर्णन लोक भीष्मकाला पाहिले नाही तोवरच करीत होते. त्याचे रूप मदनालाही मागे टाकणारे होते. त्याची नीति संतांप्रमाणे उच्च होती. त्याचे शौर्य पाहून शत्रूची छाती फाटत होती. तो इतका उदार होता की याचकाच्या हातावर दान देताना जे पाणी सोडले, त्याचे सरोवर झाले. अष्टमहासिद्धी त्याच्या घरी दासी होत्या. साक्षात लक्ष्मी ज्याच्या पोटी जन्मली त्याच्या ऐश्वर्याचे वर्णन काय करावे? समुद्रापेक्षा जास्त रत्ने त्याच्या भांडारात होती. सागर कधी कधी लोकांना बुडवितो. गावे नष्ट करतो. म्हणून भीष्मकाची तुलना सागराशी करता येत नाही. ज्याची कन्या साक्षात लक्ष्मी, जावई भगवान विष्णु व नातु मदन झाला त्या भीष्मकाचे सौंदर्य काय वर्णावे? तो एका देशाचा जरी राजा होता तरी त्याची आज्ञा दशदिशांना चालत होती. त्याच्या कन्येने श्रीकृष्णाला बोलावले तेव्हा चौदा भुवनांचा अधिपती श्रीकृष्ण धावत आला. ज्याच्या उदरात त्रैलोक्मयाचा साटोवा आहे तो कृष्ण ज्याने स्वहस्ते पूजिला, त्या भीष्मकाची थोरवी काय वर्णन करावी? त्याच्या यशाची तुलना नक्षत्राधिपती चंद्राबरोबर केली तरी कमीच ठरेल. असा भीष्मक राजा उदार, धीर वीर व गुणगंभीर होता. तो पितृवत् प्रजापालन करीत होता. त्याची पट्टराणी होती शुद्धमती. ती नावाप्रमाणेच शुद्ध बुद्धीची होती. शुद्धमती श्रद्धावती होती. बुद्धी व श्रद्धा यांचा अपूर्व मिलाफ तिच्या ठायी झाला होता. ती महान पतिव्रता होती. तिला व्रतवैकल्ये करण्याचा नाद होता. भीष्मक व शुद्धमती यांचे देह वेगळे होते पण मन एक होते. विचार एक होते.

त्यांना ओळीने पाच पुत्र झाले. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहु, रुक्मकेशी व रुक्ममाली. यातील कनि÷ चार पुत्र चांगले होते. पण सर्वात ज्ये÷ रुक्मी हा दुष्ट होता. त्याची बुद्धी कधी सन्मार्गाकडे वळली नाही. लहानपणापासून तो दुष्टपणा करीत होता. पाच पुत्र झाल्यावर भीष्मक व शुद्धमती यांना वाटले, आपल्याला एखादी कन्या असावी. माणसाचे मन विचित्र आहे. त्याला त्याचेपाशी जे नाही ते हवे असे वाटते.

Ad. देवदत्त परुळेकर