|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आयुक्तांना हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

आयुक्तांना हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार 

सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात  आमदारांसमोर वाचला पाढा

सांगली

 आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नका. त्यांच्या अडेलतट्टूपणामुळेच शहरातील विकासकामे रखडली आहेत. प्रत्येक फाईलवर उलटसुलट शेरे मारून विकासकामांच्या आड येणाऱया आयुक्त रवींद्र खेबुडकर  यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपाचे नेत आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. दरम्यान, आयुक्तांना हटविण्यासाठी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे हे सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. गाडगीळांनी त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही असे भाजपाच्या नगसरेवकांना सांगितल्याने या तक्रारीचा पाढा थांबला.

 महापालिकेची शुक्रवारी महासभा होणार आहे. त्यासंदर्भात स्थायी समिती सभागृहात पार्टी मिटींग आयोजित करण्यात आली होती. या पार्टी मिटींगला आमदार सुधीर गाडगीळ हेही उपस्थित राहिले. गाडगीळ उपस्थित झाल्यानंतर मग मात्र नगरसेवकांचा संयम सुटला आणि त्यांनी आमदार गाडगीळ यांनाच प्रतिप्रश्न करत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय शासन कसे घेऊ शकतो असा सवाल केला. त्यावेळी आमदार गाडगीळ यांनी ही मुदतवाढ देण्यात आली नाही यासंदर्भात आपण सविस्तर माहिती घेवूनच तुमच्याशी बोलतो असे सांगितले. तसेच आयुक्तांची बदली झालीच पाहिजे. ती होण्यासाठी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे आम्ही एकत्रित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  आयुक्त खेबुडकर हे नगरसेवकांचा सातत्याने अवमान करत आहे. त्यामुळे त्यांच्याठिकाणी दुसरा आयुक्त द्यावा अशी मागणी महापालिकेच्या सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. भाजपाने आयुक्त हटविण्यासाठी एकी दाखविली आहे. महापौर सौ. संगीता खोत यांच्या लेटरपॅडवरून ही लेखी तक्रार दोनच दिवसापुर्वी केली असून त्यावर भाजपाच्या सर्वच 41 नगरसेवकांच्या सहय़ा आहेत. त्यानंतर गुरूवारी आमदार सुधीर गाडगीळ हे स्वतः महापालिकेत आले त्यावेळी त्यांनी या नगरसेवकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर या नगरसेवकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना ऐकून आमदार गाडगीळ ही चिडले आणि त्यांनी आयुक्त हटविणे गरजेचेच आहे अशी भूमिका घेतली.

 भाजपाची सत्ता येऊनही विकासकामे न होण्यास आयुक्त खेबूडकर हे या सर्व कारभाराला जबाबदार आहेत. ते आपल्या पक्षाच्या सदस्यांची कोणतेही विकासकामे करत नाही. त्यांना  अपमानास्पद वागणूक देतात. त्यांनी वादग्रस्त नगरोत्थान योजनेची  महासभेच्या मनाईनंतरही बिले बेकायदेशीर काढण्यावर भर दिला आहे. शहरातील डी.पी. रस्ते करणे, अतिक्रमणे हटविणे, पाणी पुरवठा नियोजन, आरोग्य विभागाला शिस्त लावणे या कोणत्याही कामावर त्यांनी लक्ष दिलेले नाही. अशा कारभारामुळे महापालिकेत सर्वच विभागात अनागोंदी कारभार सुरू असून, शहराचे वाटोळे केले आहे. मनपा सत्तेचे बक्षीस म्हणून नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला होता. त्याची  निविदा प्रक्रिया खेबुडकर यांनी वेळेत राबविली नाही. त्यामुळे त्याला म्हणावी तशी गती देता आली नाही. ही कामे अचारसंहितेत कशी अडकतील ह्याचा त्यांनी जाणीवपूर्वक बंदोबस्त केला आहे.

 सर्वच नगरसेवकांना खेबुडकर अपमानास्पद वागणूक देतात. आलेल्या फाईल्सवर कामे अडविण्यासाठी त्यांच्या मनात येईल ते शेरे मारतात. एकूणच अशा कारभाराने अमृत, ड्रेनेज, शेरीनाला, झोपडपट्टी पुर्नवसन, रस्तेकामे सर्व काही रखडले आहे.  त्यावर खेबुडकर यांनी कोणतेही लक्ष दिलेले नाही. एकूणच त्यांच्या अशा कारभाराने शहराचे वाटोळे झाले आहे. आयुक्त खेबुडकर यांची 9 जून 2019 रोजी तीन वर्षे नियुक्तीची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ येथून बदली करावी. अशी मागणी एकमुखाने सर्वच भाजपाच्या नगरसेवकांनी केली. यावेळी महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अजिंक्य पाटील, गटनेते युवराज बावडेकर नगरसेवक शेखर इनामदार  यांच्यासह सर्व भाजपा नगरसेवक उपस्थित होते.

बदली करा अन्यथा कामावर परिणाम

महापालिकेकडे केंद्र आणि राज्यशासनाकडून मोठय़ाप्रमाणात निधी आला आहे. पण या निधीचा वेळेत विनियोग होत नाही. त्यामुळे शहरात एकही विकासकाम दिसून येत नाही. आयुक्त जर येथेच राहिले तर त्याचा विकासकामांवर विपरित परिणाम होणार आहे त्यामुळे काहीही करा, पण आयुक्तांची बदली करा अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी आमदार गाडगीळ यांच्याकडे केली.

 

 

Related posts: